अहमदनगर

नगर : शेतशिवारात ’आंबेबहर’ मोहरला ; आंबा, संत्रा, मोसंबी झाडे बहरात

अमृता चौगुले

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा :  फळांचा राजा असलेला आंबा यावरून ओळखला जाणारा फळझाडांचा 'आंबेमोहोर' सध्या सर्वत्र शेतशिवारात मोहरला आहे. फळबागा, मोठी आंबा झाडे व इतर फळझाडांना फुलोरा लगडला असून, या उमललेल्या फुलोर्‍यातून शेतशिवारात सुगंध दरवळतो आहे.  सद्यस्थितीत खरीप हंगामात फुलोर्‍यात येणारे चिंच, कौठ, बोर ही झाडे फळांनी लगडलेली असून, आपल्या अंगी असलेल्या आंबट, गोड, तुरट गुणधर्मामुळे सध्या अबालवृद्धांच्या तोंडचे चोचले पुरवित आहेत. दिवाळी सणाच्या लक्ष्मीपूजनाच्या ताटात कौठ, चिंच, पेरू, डाळिंब आपले महत्त्व अधोरेखित करतात.

तर, सुवासिनींचा लाडका मकरसंक्रांत सणातील ओवशातील बोरांचे महत्त्व आपण जाणतोच. खरीप हंगामातील ही फळझाडे सध्या लक्षवेधी आहेत. तर, अशातच आगामी उन्हाळ्यात येणारी आंबा, मोसंबी, संत्रा, डाळिंब, पेरू ही मुख्य फळझाडे सध्या मोहरली असल्याने, शेतातील झाडे व फळबागा एका वेगळ्याच रंगात रंगलेली दिसतात. यात मुख्यत्वे आंबा यंदा मोठ्या प्रमाणावर मोहरलेला दिसतो आहे. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, काकडी आदींच्या बाजारात आंबा मुख्य आकर्षण असते. आमरस खाण्यास खाद्य संस्कृतीला जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण असून, ती दरवर्षीची एक परंपराच बनली असल्याचे शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

रब्बी हंगामातून अपेक्षा

सद्य स्थितीत शेतशिवारात रब्बी हंगामातील पिकांनी हिरवा शालू पांघरलेला आहे. गहू, कांदा, ऊस ही मुख्य पिके बहरलेल्या अवस्थेत आहेत. अशातच आंबेमोहोर फळझाडांना लगडला असून, खरिपात झालेल्या चांगल्याप्रकारे पावसाने रब्बी हंगाम जोरदारपणे उभा राहिला आहे. फक्त खरिपात झालेल्या नैसर्गिक आपत्तीची पुनरावृत्ती रब्बी हंगामात होऊ नये व शंभर टक्के पीक हातात पडावे, हिच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत, असे देवटाकळी येथील युवा शेतकरी अनिल मेरड यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT