अहमदनगर

नगर : शनिशिंगणापुरात भक्तांची मांदियाळी

अमृता चौगुले

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  शनिशिंगणापूर येथे शनिवारी अमावस्या यात्रेनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला होता. आठ लाखांहून अधिक भाविकांनी स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले. गर्दीमुळे दुपारी वाहनतळ परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा त्रास भक्तांना सहन करावा लागला. अमावस्या लागण्यापूर्वी नेहमी प्रमाणे पहाटे साडेचार वाजता होणारा आरती सोहळा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती झिम्बाब्वेचे शनिभक्त जयेश शहा व ऑस्ट्रेलियाचे उद्योजक राकेशकुमार यांच्या हस्ते झाली. सायंकाळची सूर्यास्त आरती ओरिसाचे आरोग्यमंत्री नब किशोरीदास व तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांच्या हस्ते झाली.

सोनई, घोडेगाव व इतर रस्त्यांवर जवळच्या टप्प्यात वाहनतळ करण्यात आले होते. मात्र, भाविकांच्या प्रचंड गर्दीने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनतळ येथे पूजा साहित्याचे एजंट व लटकूंनी रिक्षा व मोटारसायकलवर भाविकांना ठराविक दुकानात नेऊन सक्तीने पूजा साहित्य दिले. विशाल भंडारा मित्र मंडळ(दिल्ली) मेहतानी ग्रुप, अशोक गर्ग मित्र मंडळ, पंकज मित्तल परिवारासह मुंबई येथील भक्तांनी मोफत महाप्रसाद वाटप केले. अनेक भक्तांनी चप्पल, छत्री, मिठाई व उबदार कपड्यांचे वाटप केले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात मान्यवर भाविकांचा सन्मान युवानेते उदयन गडाख यांनी केला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त मंडळ, माजी विश्वस्त उपस्थित होते.

ओरिसाचे आरोग्यमंत्री नब किशोरीदास, हिवरेबाजारचे पद्मश्री पोपटराव पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीएस दिलीप राजूरकर, परिवहन विभागाचे आयुक्त विवेक बिमनवार यांनी दर्शन घेतले.

खुष्कीच्या मार्गावर लटकू
गावातील सर्व खुष्कीच्या मार्गांवर लटकूंची भाविक पटविण्यासाठी धावपळ पाहावयास मिळाली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी सक्षम नियोजन केले होते. मात्र, तरीही शिंगणापुरात लटकूंची संख्या जास्तच होती.

SCROLL FOR NEXT