माळवाडगांव : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र सरालाबेट येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 120 व्या पुण्यातिथी सोहळ्यासह भव्य मंदिर जिर्णोद्धार, विविध देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री हरिहर महायाग यज्ञ सोहळयाची आज शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने हजारो भाविकांच्या मांदियाळीत सांगता झाली. योगिराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 120 व्या पुण्यातिथी सोहळ्याचे औचित्य साधून श्रीक्षेत्र सरालाबेट येथे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली दि.16 ते 23 डिसेंबर दरम्यान भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि.16,17,18 डिसेंबर भव्य दिव्य मंदिर जिर्णोद्धार विविध देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा.दि.19, 20, 21 डिसेंबर श्री महायाग हरिहर यज्ञ सोहळा, सात दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या विविध धार्मिक सोहळ्याची सांगता महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी काल्याचे कीर्तनप्रसंगी कृष्ण वेधीली विरहिणी बाले, चंद्रमा करितो ऊबारागे माय, न लावा चंदनू अंगी न घाला विंधन वारा , हरि विन शुन्य शेजारून गे माय !! या श्रीकृष्ण चरित्रपर गौळण अभंगावर भाविकांना कीर्तनातून निरूपण केले. याप्रसंगी व्यासपीठावर श्रीक्षेत्र पंढरपूर विठ्ठल – रूक्मिणी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , कृष्णगिरी महाराज (सावदा), लक्ष्मण महाराज मेंगडे, मठाधिपती बंकटस्वमी देवस्थान नेकनूर, किसन महाराज पवार मठाधिपती मुकुंदराज संस्थान आंबेजोगाई, महंत आनंदगिरी महाराज,शिवगिरी महाराज, आमदार रमेश बोरनारे, माजी आ. भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आ.स्नेहलता कोल्हे, अविनाश गलांडे, संतोष जाधव, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कर्हाड यांचे सुपुत्र हर्षवर्धन कर्हाड, उपनगराध्यक्ष साबेरभाई, ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रकाश चित्ते, बबन मुठे, बाबासाहेब चिडे, बाळासाहेब कापसे, सिध्दार्थ मुरकुटे,बाबासाहेब जगताप, नंदू संचेती, ज्ञानेश्वर टेके, सचिन जगताप, दत्तात्रय खपके, अशोक बोर्हाडे या मान्यवरांसह सरालाबेट ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ, शिष्यगण महाराज मंडळी विद्यार्थी ऊपस्थित होते. सुत्रसंचलन नवनाथ महाराज म्हस्के तर आभार मधुकर महाराज कडलग यांनी मानले. श्रावणातील सद्गुरू गंगागिरी महाराज मोठ्या सप्ताहाप्रमाणे भाविकांची गर्दी असल्याने 200 ट्रॅक्टर महाप्रसाद बुंदी, चिवडा वाटपासाठी तैनात होते. महाप्रसाद वाटप नियोजन सुरळीत पडले. या सांगता सोहळ्याचे दिवशी नगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यातून भाविक आले होते.
योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी तपश्चर्येसाठी कुटियात या बेटाची निवड केली. गोदावरी मातेने या देवस्थानाला आपल्या मायेने कुशीत, घेतल्याने 'गोदावरी धाम श्रीक्षेत्र सराला बेट' असे या क्षेत्राचे नामकरण करण्यात आल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी कीर्तनात सांगितले.
श्रीक्षेत्र सरालाबेट संस्थानवर जोग महाराज संस्थानचे कुर्हेकर बाबांसह अनेक संत- महंत दर्शनासाठी येऊन गेले आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा व मंदिर जिर्णोद्धार, महायाग यज्ञ निमित्ताने मला दर्शनाचा योग आला. संस्थानचा परिसर गर्दीने फुललेले भक्तीमय वातावरण पाहून मन प्रसन्न होऊन दर्शन झाले. हे माझे भाग्य समजतो. असे उद्गार श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.