कर्जत/जामखेड; पुढारी वृत्तसेवा : महाआवास योजनेअंतर्गत राज्यभरात 20 नोव्हेंबर 2022 पासून घरकुलाचे सर्वाधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले. यामध्ये 1326 घरकुले पूर्ण करून जामखेड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर, तर 1282 घरकुले पूर्ण करून कर्जत तालुका तिसर्या क्रमांकावर आला आहे. आमदार रोहित पवार यांनी नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून, सरकारी योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोचविली.
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून वेळोवेळी बैठका घेऊन अडचणी दूर केल्या. शासकीय पातळीवर त्यांनी घरकुलांबाबत पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील समन्वयामुळे अशी उल्लेखनीय कामगिरी करता आली. मागच्या वर्षी घरकुल योजनेत जामखेडचा नाशिक विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक आला होता. यंदा जामखेड नगर परिषदेने घरकुल योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.
याचे श्रेय सर्वांचे : आ. रोहित पवार
घरकुल योजनेतील क्रमवारी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी अभिमानास्पद बाब आहे. याचे संपूर्ण श्रेय सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आहे, असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.