file photo  
अहमदनगर

नगर : माळीवाडा बसस्थानक होणार सुसज्ज

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. आता माळीवाडा बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी त्यांनी 16 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यातून बसस्थानकाची सुसज्ज अशी नवीन इमारत उभी राहणार आहे. माळीवाडा बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य स्थानक आहे. येथे विविध ठिकाणांहून प्रवासी ये-जा करत असतात. या बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी झाली असून, तिची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने येथे येणार्‍या प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील समस्या लक्षात घेऊन एक वर्षापासून या बसस्थानकाच्या विकासासाठी आमदार जगताप यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

अखेर त्याला यश मिळाले असून, महाराष्ट्र सरकारच्या 2022-23 करिता लेखाशीर्ष 6 फ योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाला 523 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यामध्ये माळीवाडा बसस्थानक इमारतीसाठी 16 कोटी मंजूर झाले आहेत. प्रशासकीय पातळीवर लवकरच निविदा प्रक्रिया मार्गी लागून या इमारतीचे काम सुरू होईल. नगर शहराच्या वैभवात भर घालील, अशी सुसज्ज माळीवाडा बसस्थानकाची नवीन इमारत उभी राहील, अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली. माळीवाडा बसस्थानकाच्या नवीन इमारतीत तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला, याचबरोबर पाणीपुरवठा सुविधा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, फायर फायटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाहनतळ काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक पार्किंग, कुंपण भिंत आदी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. विविध विकासकामांमुळे नगर शहर महानगराकडे वाटचाल करत आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT