अहमदनगर

सरसकट पंचनामे करून नुकसारभरपाई द्या : डॉ.क्षितिज घुले

अमृता चौगुले

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील काही भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी, या मागणीसाठी काल बुधवारी भातकुडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून लक्ष वेधले. यावेळी गारपीटग्रस्त भागात सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केली. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या उपस्थितीत बुधवार दि. 12 रोजी शेवगाव-नेवासा राज्यमार्गावर भातकुडगाव फाटा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी डॉ. घुले यांनी शासनाचे लक्ष वेधले. दोन दिवसांपूर्वी तालुक्याच्या काही भागात वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी गारपीट पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईबरोबर इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी पक्षाने हे रास्ता रोको आंदोलन करून शासन दरबारी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्नांबाबत आपण सर्वांनी संघटीतपणे लढा देण्याचे आवाहन डॉ. घुले यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव मंडल व दहिगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. बाजरी, ऊस, कांदा, चारापिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत निवडक पिकांचे पंचनामे न करता सरसकट पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. पडझड झालेल्या घरांना, जनावरांचे शेड नुकसानीस तत्काळ भरपाई द्यावी,कोसळलेले विजेचे खांब, तारा दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, शासनाने कांद्याची नाफेडमार्फत खरेदी करून वीस रुपये किलो प्रमाणे हमीभाव द्यावा, कांदा अनुदान अर्ज करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवावी, मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे, पिकविमा शेतकर्‍यांना मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, ढोरजळगावशे,आपेगाव, आव्हाणे, गरडवाडी व इतर गावात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन यावेळी परिविक्षाधिन तहसीलदार राहुल गुरव यांना देण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवक तालुकाध्यक्ष नंदकुमार मुंढे, बाजार समितीचे माजी सभापती अड.अनिल मडके, पंडितराव भोसले, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, अंबादास कळमकर, लतिफ पटेल, भरत वांढेकर, संतोष मेरड, सरपंच प्रदीप काळे, शहादेव खोसे, दादा उगले, गणेश खंबरे, भागवत बडे, संकेत वांढेकर, अभिजीत आहेर, दीपक चोपडे, दीपक देशमुख, कृष्णा पाटेकर,अर्जुन दराडे, विकास नन्नवरे, अशोक मेरड, राजेंद्र आढाव,अशोक वाघमोडे, भाऊसाहेब मडके, सीताराम कुंडकर, विठ्ठल फंटागरे, भाऊराव माळवदे, संतोष पावसे,अमोल कराड आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT