अहमदनगर

पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट, वाडेगव्हाण येथे पॉवर पेट्रोलचा वाहन चालकांना नाहक भुर्दंड

अमृता चौगुले

देवदैठण : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण परिसरातील साधे पेट्रोल शिल्लक नसल्याचे कारण देत इच्छा नसतानाही सक्तीने 'पॉवर पेट्रोल' वाहन चालकांना माथी मारले जात आहे. वाहनचालकांच्या माथी पडणारा हा नाहकचा भुर्दंड घालविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे. केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली. मात्र, याठिकाणी असणार्‍या नामांकित कंपनीच्या पंपावर चालकाच्या अडेलतट्टू भूमिकेने महाग पॉवर पेट्रोल खपविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. साधे पेट्रोल शिल्लक असतानाही ते संपल्याचे सांगून 'पॉवर पेट्रोल' सक्तीने भरण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची इच्छा नसतानाही त्यांना नाईलाजास्तव जादा दराचे पेट्रोल भरावे लागत आहे.

साध्या आणि पॉवर पेट्रोलच्या भावामध्ये साडेसहा ते सात रुपयांचा फरक पडतो. साध्या पेट्रोलचा दर 106 रूपये 9 पैसे आहे. तर, पॉवर पेट्रोलचा दर 112 रुपये 52 पैसे आहे. त्यामुळे नाहक जादा पैसे मोजावे लागत असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.
तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी वाडेगव्हाण परिसरातील पेट्रोल पंपांची तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शरद मांडगे, जालिंदर तानवडे, तुषार पवार, सतीश वाघमारे, राजेंद्र बारगुजे, तुषार लोखंडे, रवींद्र गाडेकर, डॉ. विजय यादव, अरुण चिपाडे, संदीप सोनलकर आदींनी केली आहे.

साध्या पेट्रोलचा टँकर ज्या टाकीत खाली होतो, त्यामधून टँकर खाली होईपर्यत, त्या पेट्रोलची विक्री करता येत नाही. त्यामुळे तोपर्यंत पॉवर पेट्रोलची विक्री केली जाते.
                                                                              – पेट्रोल पंप चालक

SCROLL FOR NEXT