अहमदनगर

नगर : वृद्धेश्वर मंदिरातील चार दानपेट्या पळविल्या लाखोंचा ऐवज लंपास

अमृता चौगुले

करंजी : पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर (ता. पाथर्डी) येथील मंदिरातील चार दानपेट्या चोरट्यांनी बुधवारी पहाटे पळवून नेल्या. मंदिराच्या मागील नदीजवळ या दानपेट्या तोडफोड केलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद करून घेतले होते. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून चार-पाच अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील चार दानपेट्या उचलून मागील बाजूस नेल्या.

मंदिराच्या पाठीमागे नदीच्या जवळ नेलेल्या चारही दानपेट्या विविध हत्यारांच्या साह्याने फोडून चोरट्यांनी सर्व ऐवज घेऊन पोबारा केला.
या दानपेट्यांमध्ये लाखो रुपयांच्या नोटा, तसेच भाविकांनी टाकलेले सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात असण्याचा अंदाज पुजार्‍यांनी व्यक्त केला. दानपेट्यांमधील चिल्लर मात्र चोरांनी नेली नाही. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सौरभ राजगुरू, कौशल्य निरंजन वाघ, तसेच श्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पथकातील रक्षा या श्वानाने मंदिराच्या मागे नदीजवळ टाकलेल्या दानपेट्यांपासून माग काढण्यास सुरुवात केली. मंदिराजवळील राम मंदिरापासून पुढे सावरगाव घाट या डांबरी रस्त्यापर्यंत श्वानाने माग काढला. तेथून पुढे मात्र चोरटे वाहनातून पळून गेल्याचा पोलिसांचा संशय आहे.

दरम्यान, वृद्धेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरणार्‍यांना तत्काळ अटक करावी अशा सूचना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या. घाटशिरस ग्रामस्थ देवस्थान समितीकडूनही चोरीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले असल्यामुळे त्या फुटेजचा आधार घेऊन निश्चितपणे त्यांना अटक करू, असा विश्वास पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT