अहमदनगर

रब्बीसाठी कुकडीचे आवर्तन सोडा : आ. नीलेश लंकेंचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

Laxman Dhenge

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : कांदा पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यासाठी येत्या 25 फेब्रुवारीपासून कुकडी डाव्या कालव्यावर रब्बी हंगामी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना निवेदन दिले. मराठा आरक्षणासंदर्भात बोलविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झालेल्या आमदार लंके यांनी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या मागणीची दखल घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली.

पारनेर तालुक्यातील सर्व पाणीवाटप संस्थांनी जलसंपदा विभागाकडे रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्याची मागणी केलेली आहे. सर्व पाणीवाटप संस्थांनी शासन आकारणी करत असलेली पाणीपट्टी शासनाकडे जमा केली आहे. या संस्थांकडे कोणतीही थकबाकी नाही.
पारनेर तालुक्यातील शेतकरी नगदी पिक म्हणून प्रामुख्याने कांदा लागवड करतात. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने कांदा रोपांचे नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा कांदा रोपांची निर्मिती करून लागवड करावी लागली. परिणामी लागवड उशिरा झाल्याने शेतकर्‍यांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांच्या मागणीचा विचार करून, कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन 25 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार लंके यांनी निवेदनात केली आहे. यावेळी भाळवणीचे बबलू रोहोकले उपस्थित होते.

कांदा पीक जळण्याची भिती

श्रीगोंदे, कर्जत, जामखेड या तालुक्यांना 25 फेब्रुवारी रोजी आवर्तनाची गरज नसेल तर, पारनेर तालुक्यासाठी 10 दिवसांचे 110 किलोमीटरपर्यंत आवर्तन सोडण्यात यावे. अन्यथा सुमारे 1 हजार 200 हेक्टरवरील कांद्याचे पीक पाण्याअभावी जळून जाईल, अशी भिती निवेदनात आमदार लंके यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT