अहमदनगर

Nagar : कॅफे शॉपवर एलसीबीचे छापे ; सहा चालकांविरुद्ध गुन्हा

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध कॅफे शॉपवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी दिवस छापेमारी करीत अश्लिल चाळे करताना तरूण-तरुणींना पकडले. त्यांच्या पालकांना थेट पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली. तर, सहा कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. महेश मच्छिंद्र तेलोरे (रा. तपोवन रोड, सावेडी), ऋषिकेश सखाराम निर्मळ (फरार, रा. झोपडी कॅटीन, सावेडी), रोहित कुमार साठे (रा. तपोवन रोड सावेडी), हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे (रा. तपोवन रोड, सावेडी), सागर अशोक उदमले (रा. हिवरेझरे, ता. नगर), रवी रघुनाथ चौरे (रा. गायकेमळा, कल्याण रोड), अर्जुन ईश्वर कचरे (रा. कानडेमळा, सारसनगर) असे ताब्यात घेलेल्या कॅफे चालकांची नावे आहेत.

नगर शहरात विविध कॅफे शॉपवर तरुण मुला-मुलींना मोबदला घेऊन अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची तक्रारी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे आल्या होत्या. याबाबत पुढारी ठळक वृत्त प्रसिद्ध केले होेते. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, संदीप पवार, अतुल लोटके, सागर ससाणे, अमृत आढाव, रवींद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, जालिंदर माने, महिला पोलिस कर्मचारी भाग्यश्री भिटे, सोनाली साठे, उमाकांत गावडे, अरुण मोरे यांची दोन पथके नेमून कारवाईच्या सूचना केल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. 8) सावेडी उपनगरातील लव्ह बर्डस कॅफे (श्रीराम चौक), बाबाज कॅफे (कुष्ठधाम रोड), हर्षाज कॅफे (गुलमोहर रोड), झेड के कॅफे (नगर-मनमाड रोड), गोल्डरश कॅफे (बुरूडगाव रोड), रिजकिंग कॅफे (चाणक्य चौक) कॅफे शॉपवर छापे घातले असता तरुण मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. शॉपमध्ये झडती घेतली असता शॉपचा परवाना आढळला नाही. कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी पेय सापडले नाही. खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुला-मुलींनी बसण्यासाठी कम्पार्टमेंट बनविल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वरील चालकांना ताब्यात घेऊन कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क)(क) प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कॅफे शॉपवर छापा घातल्यानंतर आढळून आलेल्या मुला-मुलींच्या पालकांना प्रत्यक्ष बोलावून घेत समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT