वळण : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वळण येथील कांद्याच्या शेतामध्ये कांदे काढताना काही मजुरांच्या डोळ्यातून सूक्ष्म अंडी व अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर सोमवारी घटनास्थळी कांद्याच्या शेतामध्ये म. फुले कृषी विद्यापीठातील कांदा पैदासकार व भाजीपाला विभाग वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या टीमने पाहणी केली, असता हा कांदा माशीपासून उद्भवलेला किडीचा प्रकार आहे. ही कीड उत्तर भारतातील पिकांवर आढळते. आपल्या भागात दुर्मिळ व क्वचितच असा प्रकार घडतो. शेतकरी बांधवांसह शेतमजुरांनी घाबरून न जाता कांदा काढतेवेळी काळजी घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. टी. पाटील यांनी केले.
वळण येथे शेतात 28 मजूर कांदे काढीत होते. यातील 16 मजुरांच्या डोळ्यांना जळजळ होऊन अळी व बारीक अंडीसद़ृश द्रव निघाल्याचे लक्षात आल्याने शेतमजुरांसह शेतकर्यांमध्ये भीती निर्माण झाली होती.
या प्रकाराची तातडीने तालुका कृषी विभागाने दखल घेऊन तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गणेश अनारसे, कृषी सहाय्यक गडदे यांनी घटनास्थळी शेतात पाहणी करून शेतकरी व शेत मजुरांना दिलासा दिला होता. सोमवारी सकाळी म. फुले कृषी विद्यापीठाचे कांदा पैदासकार व भाजीपाला विभाग वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. टी. पाटील, डॉ. डी. पी. पाचरणे, डॉ. एस. के. पवार, कीटक शास्त्रज्ञ भाजीपाला विभाग डॉ. चिमाजी भास्कर, रोग शास्त्रज्ञ डॉ. ए. व्ही. आत्तार, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी कांदा पिकामध्ये पाहणी केली असता घडलेला प्रकार उत्तर भारतामध्ये कांदा मशीनमुळे आढळणारा किडीचा आहे. महाराष्ट्रामध्ये तो एखाद्या विभागात अती क्वचित आढळत असल्याचे शास्त्रज्ञ म्हणाले. हवेतून होणारा हा प्रादुर्भाव नाही. इतर पिकांवरही तो आढळून येत नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. हा प्रकार क्वचितच घडतो. शेतकरी व मजुरांनी न घाबरता काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. डी. पी. पाचारणे यांनी केले. वळण येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केल्याने शेतकर्यांसह मजुरांमधील भीती दूर होणार आहे.
माशी एकावेळी सुमारे 100 अंडी घालते..!
जमिनीच्या पृष्ठभागावर व कांद्याच्या पापुद्रामध्ये कांदा माशी अंडी घालते. एक माशी एकावेळी सुमारे 100 अंडी घालते. अंडे ते माशीचा पूर्ण कार्यकाळ 37 ते 60 दिवसांचा असतो. यामुळे घाबरून न जाता शेतकरी व शेत मजुरांनी कांदे काढताना डोळ्यांना गॉगल लावावा. कांदे काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. कांदे उपटताना माती अंगासह तोंडावर उडेल असे जोरात न उपटता हळू-हळू उपटावे. ही कीड केवळ कांदा व लसूण या दोन पिकांवरचं क्वचित आढळून येते.