अहमदनगर

आमदार लंके शेतकर्‍यांच्या बांधावर ! पिकांच्या नुकसानीची पाहणी

अमृता चौगुले

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या विविध पिकांच्या नुकसानीची आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी (दि.27) सकाळी सात वाजताच शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत व शासनाने प्रत्यक्ष भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार लंके यांनी यावेळी केली. तालुक्यातील पारनेर, पानोली, वडुले, सांगवी सूर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगाव, म्हसणे सुलतानपूर, गटेवाडी, पठारवाडी, लोणीमावळा या गावांमध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे शेतांमधील पिके भुईसपाट झाली असून, फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. विजेचे खांब पडल्याने अनेक गावे अंधारात आहेत.

संबंधित बातम्या :

आमदार लंके यांनी सकाळी सात वाजता पानोलीच्या पवळ दर्‍यातील किसन पवार यांच्या कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. माझ्या आयुष्यात अशी आपत्ती मी पाहिली नाही, अशा भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या. सोलर प्लॅन्ट, सिमेंट पत्रे यांच्यासह वाहनांच्या काचाही गारपिटीमुळे फुटल्याचे यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. शेतामध्ये काम करणार्‍या शेतकर्‍याच्या, मजुरांच्या डोक्यावर, पाठीवर, तोंडावर गारपिटीमुळे जखमा झाल्याचेही यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आमदार लंके यांनी पानोलीसह वडुले, सांगवी सूर्या, गांजीभोयरे येथील नुकसानीची पाहणी करून शेतकरी वर्गाला धीर दिला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार लंके म्हणाले, रविवारी दुपारी चार वाजल्यापासून तालुक्याच्या विविध भागाते वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट सुरू झाली. अर्धा तास, एक तासाच्या कालावधीमध्ये होत्याचे नव्हते झाले. टोमॅटो, कांदा, ज्वारी, जनावरांचा चारा यासह फळबागांचे शंभर टक्के नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करताना 85 वर्षांच्या आजीबाई भेटल्या. माझ्या आयुष्यात अशी गारपीट मी पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले, यावरून या संकटाच्या भीषणतेचा अंदाज येईल. हा दुष्काळी तसेच आदिवासी लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करून दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडले.

थोड्याफार पावसावर शेतकर्‍यांनी घेतलेली पिकेही गारपिटीने उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. यावेळी माजी सभापती बापूसाहेब भापकर, संदीप गाडेकर, शिवाजी शिंदे, प्रवीण थोरात, रामभाऊ थोरात, शहाजी थोरात, नारायण साठे, मोहन आढाव, हरिभाऊ गायकवाड, तुषार गाडेकर, गोरक्ष भगत, शिवाजी पवार, शरद गायकवाड, राजेंद्र पठारे, राजेंद्र चेडे, बाबूराव नवले, बापूसाहेब खामकर, बाळासाहेब निमोणकर, योगेश गायकवाड, लबाजी झिंजाड, अक्षय म्हस्के, सुदाम रासकर, मोहन झंजाड, सुरेश म्हस्के, उत्तम नगरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे भरपाईची मागणी
या नुकसानीबाबत रविवारी रात्रीच आपण जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी चर्चा केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरसकट पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT