अहमदनगर

नगर : भूमी अभिलेखपाल लाचेच्या जाळ्यात

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शेतीची मोजणी करून जमिनीचा नकाशा व रिपोर्ट न्यायालयात सादर करण्याच्या बदल्यात 25 हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेखपालाला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. राहाता भूमिअभिलेख कार्यालयातील विकास सूर्यभान दुशिंग असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. या कारवाईने भूमिअभिलेख कार्यालयातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर बुद्रुक येथील तक्रारदाराने 2017 मध्ये गट क्रमांक व उपविभाग 65 मधील 1.52 हेक्टर शेती विकत घेतली होती. या क्षेत्राची तक्रारदाराने खासगी मोजणी केली असता क्षेत्र कमी भरले होते.

त्यामुळे शेतीच्या मोजणीसाठी तक्रारदाराने 2022 मध्ये राहाता दिवाणी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने 4 फेब्रुवारी 2023 भूमिअभिलेख कार्यालयाला जमिनीचा नकाशा व रिपोर्ट 10 मार्च 2023 पर्यंत सादर करण्याचा आदेश बजावला होता. दरम्यान, हा नकाशा रिपोर्ट अभिलेखपाल दुशिंग याने तयार केला होता. परंतु, न्यायालयात सादर केला नव्हता. त्यासाठी दुशिंग याने तक्रारदाराकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.5) राहाता भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावून दुशिंगला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, हारुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT