खेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस सध्या मोडकळीस आल्या असून, या वेगवेगळ्या आगाराच्या बस कर्जत-बारामती राज्यमार्गावर नादुरुस्त अवस्थेत आढळून येतात. विशेष म्हणजे बहुतांशी बसेसचे ब्रेक फेल होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या अनेक प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.
खेड (ता.कर्जत) येथे नादुरुस्त असलेल्या बस आणि विरुद्ध दिशेने येणार्या बसच्या धडकेने नुकताच खेडच्या बदामबाई शेटे यांचा मृत्यू झाला होता. बसचालक आणि वाहकाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावरील छोटे-मोठे वाहनचालक आणि दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या प्रत्येक गावाच्या यात्रा-जत्रा, लग्न समारंभांमुळे बस सेवेवर वाहतुकीचा बोजा वाढला आहे. त्यातच महिलांना प्रवासी भाड्यात सरकारने 50 टक्क्यांची सवलत दिल्याने महिलांच्या गर्दीने बस खचाखच भरलेल्या दिसून येतात.
असे असले तरी अनेक बस निकामी झाल्या आहेत. काही गाड्यांची अवस्था तर खूपच खराब झाली आहे. सुमारे 80 टक्के बस जुन्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या बस रस्त्यावर मध्येच बंद पडतात. जुन्या बसमुळे प्रदूषणासह ध्वनिप्रदूषणही वाढले आहे. अनेक बसचे पत्रे निखळलेले आहेत.
रिमोल्ड केलेले टायर वापरले जात आहेत. काही वेळा टायरमधील तारा बाहेर आल्याने भर रस्त्यात टायर फुटून अपघात होतात. या सर्व बाबींचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. बस रस्त्यावर अचानक नादुरुस्त झाल्याने बसमधून प्रवास करणार्यांचेही हाल वाढले आहेत. तासंतास रस्त्यावर प्रवाशांना अडकून पडावे लागते. यामुळे बसचे वेळापत्रकही कोलमडत आहे. अनेकांच्या जीवावर बेतत असलेल्या या बससवेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अनेक वर्षानंतर राज्यमार्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अगोदर रस्ता खराब होता म्हणून अपघातांचे प्रमाण वाढले होते. आता, परिस्थिती उलट आहे. रस्ता सुसाट झाल्याने अपघात वाढले. नादुरुस्त बससेवेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नादुरुस्त बसेसमुळे अपघात होत असतील तर ही खरोखरच खेदाची बाब आहे.
– अमृता वाघमारे, सरपंच, खेड, ता.कर्जत