अमोल गव्हाणे
श्रीगोंदा(अहमदनगर) : तालुक्याच्या पूर्व भागात कुकडीचे पाणी न मिळाल्याने हजारो एकर उसाचे क्षेत्र जळून जाण्याच्या मार्गावर असतानाच सलग दोन दिवस वरुणराजाने हजेरी लावल्याने उसपिकांना संजीवनी मिळाली. कुकुडीच्या पाण्याने मारले अन् पावसाने तारले, असेच म्हणावे लागेल. कुकडीच्या पाण्याचे कागदोपत्री श्रेय घेणार्या मंडळीना चांगलीच चपराक बसली आहे. कुकडीच्या पाण्याबाबत दरवर्षी बोंबाबोंब होते, तशी यावर्षीही झाली. तालुक्याच्या पूर्व भागात कुकडीचे आवर्तन सुरू होताच कालव्यातील पाणी कमी झाले. वरच्या भागातील शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्यांना हाताशी धरून चार्या खोलून घेतल्या.
आणि पूर्व भागातले सिंचन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अपूर्ण राहिले. 14, 13, 12 अन् 11 वितरिकांना काही तास पाणी सोडण्यात आले. सुरुवातीच्या भागातील सिंचन वगळता अन्य ठिकाणी पाणीही पोहचू शकले नाही. शेतकर्यांनी पाण्याची ओरड सुरू केली असताना तालुक्यातील नेतेमंडळींनी पत्रव्यवहाराचा मुद्दा पुढे करत आपण तीन दिवस आवर्तन वाढविले असल्याचा दावा केला. हा दावा शेतकरी हिताचा की, राजकीय अस्तित्व टिकविण्याचा हे न समजण्या इतका शेतकरी नक्कीच खुळा नाही, असे बोलले जात आहे. तीन दिवस आवर्तन वाढविले; पण त्याचे नियोजन कसे? त्या वाढीव आवर्तनाचा फायदा सगळ्या भागाला होणार का, असे प्रश्न अनुत्तरितच राहिले.
पाणी वरच्या भागातील नेतेमंडळीनी विसापूर कालव्यात वळवून घेतले ही बाब नाकारून चालणार नाही. दरवर्षी उन्हाळ्यात मिळणार्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो अन् तसाच राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याचे योग्य नियोजन होत नसेल तर बैठकांचा फार्स कशासाठी? पूर्व भागातील शेतकरी पाण्यापासून नेहेमीच वंचित राहणार असेल तर ही पूर्व भागातील शेतकर्यांची थट्टा नव्हे का?, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. कुकडीच्या पाण्यामुळे पूर्व भागातील पिके जळाली, तर वेळीच वरुणराजाने कृपा केल्याने काही पिके वाचली अशा बोलक्या प्रतिक्रिया शेतकर्यांमधून ऐकायला मिळत आहेत. कुकडीचे पाणी मिळाले नाही या चिंतेत शेतकरी असताना दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रत्येक तालुक्याला किती पाणी मिळणार याचे नियोजन होते. मात्र, प्रत्यक्षात त्या प्रमाणात पाणी मिळाले का? याची कुणी साधी चौकशी करत नाही. कोणत्या वितरिकेला किती पाणी मिळाले, किती सिंचन झाले याची आकडेवारी समोर आली तर कुकडी विभागाचा भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नाही.
कुकडीचे आवर्तन जसे काही भागातील शेतकर्यांना वरदान ठरत आहे, तसेच हे आवर्तन पाटबंधारे विभागाच्या काही मंडळींच्या चांगलेच पथ्यावर पडत आहे. आवर्तनातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून, शेतकर्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी काही मंडळी तत्पर असतात. पैसे दिल्यानंतर मुबलक पाणी मिळत असल्याने यावर कुणी आवाज उठवत नाही.
पूर्व भागाचे नेते मिलिंद दरेकर म्हणाले, कुणी कितीही दावा केला असला तरी कुकडीचे पाणी पूर्व भागाला मिळाले का असे विचारले तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोकणगाव, हिरडगाव, चाडगाव, घोडेगाव, आढळगाव भागातील शेतकर्यांना पाणी मिळाले नाही, हे वास्तव आहे. पाणी न मिळाल्याने उसाची पिके जळून गेली.
हेही वाचा