अहमदनगर

नगर: कोपरगावातील लाचखोर तहसीलदारास न्यायालयीन कोठडी, तहसीलदार तुरुंगात, वाळू उपसा जोमात  

अमृता चौगुले
कोपरगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: तहसीलदार विजय बोरुडे व त्याचा हस्तक गुरमितसिंग दडियाल यांना नेवासा जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. एम. पाटील यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी लाचलुचपत नगर विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.
दरम्यान कोपरगाव तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात अडकून तुरुंगात जाताच तालुक्यात वाळू तस्करी जोरात सुरू झाली असून, आम्ही हप्ता दिला आहे मग आम्ही नुकसान का सहन करायचे ? असा थेट सवाल वाळू तस्कर करू लागले आहेत. 'तहसीलदार जेलात, वाळू उपसा जोमात, महसूल व पोलिस प्रशासन कोमात'; असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
तहसीलदार विजय बोरुडे  हस्तक दडियाल हे  20 हजारांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाई मध्ये रंगेहाथ पकडल्याने यांच्यावर कारवाई  झाल्यानंतर त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले, तहसीलदार यांच्या अटकेमुळे वाळू माफियांचे चांगले फावले आहे. गोदावरी नदी पात्रातून दिवसा ढवळ्या फरांडीच्या साह्याने  खुलेआम वाळू उपसा होत आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असतानाही तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिस यंत्रणा यांचे या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू  आहे.
तालुक्यात वाळू तस्करांची खास यंत्रणा सर्वपरिचित आहे. अधिकार्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी या तस्करांनी काही युवकांची मानधनावर नियुक्ती केली आहे. महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या युवकांना देण्यात आलेली असते. तहसीलदार कोठे जातात? याचा अंदाज हे युवक घेतात. तहसीलदार अथवा तहसील कार्यालयातील कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती मिळताच ते वाळू वाहतूक करणार्‍या चालकांना याची माहिती देतात. यामुळे अधिकारी पोहोचणे अगोदरच सर्व गायब झालेले असतात.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेले कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे व त्यांचे हस्तक गुरमीतसिंग दडियाल या दोघांना सोमवारी नेवासा येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर  केले असता विशेष  न्यायालयाचे न्यायाधीश जे. एम.  पाटील यांनी निर्णय राखून ठेवत दोन्ही आरोपींना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान दोन्ही आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती  तपासी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नगर पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आमचे प्रतिनिधीस दिली.तहसीलदारांवर कारवाई झाल्याने अवैध वाहतूकदारांचे चांगलेच फावलेले आहे. त्यांच्यावर आता कोण कारवाई करणार?
राज्य सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. यावर सरकार ठाम आहे. थोडा वेळ लागेल, परंतु हे होणारच आहे.  त्यानुसार ग्राहकांना 600 रुपये ब्रासने वाळू मिळणार आहे. त्यामुळे अवैध वाळू उपशाला लगाम लागेल, अशी अपेक्षा आहे. ऑनलाईन बुकिंगनंतर 15 दिवसांत वाळू घरपोच मिळण्याचे हे धोरण आहे. यामुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हास कमी होणार आहे. या धोरणामुळे नदीपात्र सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. वाळू तस्करीमुळे होणार्‍या गुन्हेगारीला आळा बसेल.
– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT