अहमदनगर

हिंदूजन आक्रोश मोर्चामुळे दणाणले कोपरगाव शहर..!

अमृता चौगुले

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हिंदू भगिणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (गुरुवाधरी) सकल हिंदू समाजाच्यावतीने कोपरगावात सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवून शहरासह तालुक्यातील तब्बल 80 गावांमधील हिंदू बांधव, भगिणी, महिला, तरुण व सर्वपक्षीय हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत लव- जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सकाळी 10ः30 वा. मोर्चा सुरु झाला.

'छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, अण्णाभाऊ साठे की जय, भारत माता की जय, गर्व से कहो हम हिंदू हैं, लव जिहाद कायदा झालाच पाहिजे आदी घोषणांनी मोर्चेकर्‍यांनी शहर परिसर दणाणून सोडला. हिंदू भगिणीवर अत्याचार झालेल्या शहरालगतचा अवैध मदरसा 24 तासांच्याआत काढावा, शहरात मस्जिदवरील भोंगे तातडीने बंद करावेत, अन्यथा त्यांच्यासमोर हिंदूंच्या घरांवर प्रति भोंगे लावू, असा सज्जड इशारा सुदर्शन वाहिनीचे प्रमुख संचालक सुरेश चव्हाणके यांनी यावेळी दिला. दरम्यान, लव- जिहाद विरोधात कठोर कायदा करून, त्याची राज्यात अंमलबजावणी करावी, गोहत्या बंद करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

मोर्चाचे एक टोक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून गांधी चौक, गांधीनगर, श्रीराम मंदिर रोडपर्यंत दुसरे टोक होते. तहसील कार्यालयासमोरून धारणगाव रोड येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याला वळसा घालून मुख्य रस्त्यावर स्मारकाजवळ मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले. मोर्चेकरांच्या हातात विविध फलक, भगवे ध्वज, डोक्यात भगव्या टोप्या, महिलांनी परिधान केलेल्या भगव्या साड्यांमुळे सर्व परिसर भगवामय झाला होता.

चव्हाणके म्हणाले, कोपरगावचा परिसर ऐतिहासिक पौराणिक संदर्भाचा आहे. येथे गुरु शुक्राचार्य महाराजांचे जगातील एकमेव मंदिर आहे. संजीवनी मंत्राची येथे उत्पत्ती झाली. हे अतिशय धार्मिक ठिकाण आहे, मात्र कोपरगाव शहरातकडे बारकाईने लक्ष दिले नाही, म्हणून पाकिस्तान व बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते, असे निदर्शनास आणून देत चव्हाणके म्हणाले, हिंदूंनी या प्रकाराला प्रखर विरोध केला पाहिजे. अन्याय, अत्याचाराविरोधात पेटून उठले पाहिजे. दक्षिण गंगा गोदावरी किनारी हनुमान मंदिर परिसर, सुभाष नगर काबीज केला जात आहे, याबाबत हिंदूंना पुढाकार घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

शहर परिसरात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर आल्याचा दावा चव्हाणके यांनी केला. शहरात अवैध कत्तलखाने तातडीने बंद करा, धर्मांतरण बंदी कायदा त्वरित आणावा, इस देशमें रहना है तो, वंदे मातरम् कहेना होगा, असा इशारा अबू आजमी यांना देऊन टिपू सुलतान जयंती बंद करावी, हिंदू मंदिरात ड्रेस कोड त्वरित लागू करावा, जनसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे, अशा मागण्या चव्हाणके यांनी केल्या.

यावेळी सागर बेग यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. लव- जिहादसारख्या प्रकरणात पोलिस गुन्हे दाखल करीत नाहीत. लव- जिहाद्यांनी नगर जिल्ह्याला विळखा घातला आहे. अनधिकृत मदरशांविरुद्ध कारवाई करावी, हिंदू मुलींना न्याय मिळालाच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी हर्षदा ठाकूर व श्वेता शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी मंजूरचे संत शिवानंदगिरी महाराज, कुंभारीचे राघवेश्वरानंद महाराज, माजी आ. स्नेहलता कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, पुष्पाताई काळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, हजारो नागरिक व महिला उपस्थित होत्या. प्रांताधिकारी व तहसीलदारांनी छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ येऊन निवेदन स्वीकारले. सूत्रसंचालन करुन संतोष गंगवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोपरगाव शहराला आले छावणीचे स्वरुप..!

हिंदू जनक्रोश मोर्चासाठी1 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 1 अप्पर पोलिस अधीक्षक, 5 उपविभागीय पोलिस अधिकारी, 17 पोलिस निरीक्षक, 38 सहाय्यक पोलिस निरीक्षक व उप निरीक्षक, राज्य राखीव पोलिस दलाच्या 6 प्लाटून, 326 पोलिस अंमलदार, 50 महिला राखीव पोलिस, साध्या वेषातील पोलिस असा पोलिस बंदोबस्त तैणात ठेवल्याने कोपरगावला जणू छावणीचे स्वरुप आले होते.

  • कोरोनानंतर प्रथमच कोपरगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
  • सभा सर्वांना पाहता यावी यासाठी मोठे स्क्रीन (एलसीडी) लावले होते.
  • मोर्चेकरांसाठी ठिक-ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती.
  • भगवे ध्वज, भगव्या टोप्या, उपरण्यांमुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसले.
  • मुख्य रस्त्यांवर दुतर्फा इमारतींवर महिलांची गर्दी होती.
  • फास्टट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची केली मागणी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT