अहमदनगर

देशासाठी कृषी पदवीधारकांचे ज्ञान महत्त्वाचे : राज्यपाल रमेश बैस

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : कृषीप्रधान भारत देशासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन महत्वाचे आहे. देशातील 58 टक्के जनतेचे भवितव्य कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या कृषी प्रधान परंपरा जपण्याची नामी संधी कृषी पदवीधारकांना मिळाली आहे. 2047 चा विकसित भारत घडविण्यासाठी कृषी विद्यापीठांमधून पदवी संपादित केलेल्या तरूणांच्या ज्ञान व कौशल्य महत्वाचे ठरणार आहे. आजचे कृषी पदवी प्राप्त विद्यार्थी हे नवपरिवर्तनाचे अग्रदूत म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले. महात्मा फुले विद्यापीठाच्या 37 व्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उद्देशून अध्यक्षस्थानावरुन राज्यपाल रमेश बैस ऑनलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ट्रस्ट फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषी संशोधनचे माजी सचिव तथा भारतीय कृषी अनुसंधानचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर. एस. परोदा होते. व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, परभणीचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, अकोलाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, दापोली, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. प्रदिप इंगोले, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. सी.एस. पाटील, कुल सचिव डॉ. विठ्ठल शिर्के, सदाशीव पाटील, मिलिंद ढोके, डॉ. दिलीप पवार, उपकुल सचिव स्वाती निकम उपस्थित होते.

कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती धनंजय मुंडे यांच्या संदेशाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वाचन केले. संदेशात कृषी मंत्री मुंडे म्हणाले, कृषी क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगती होत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा यात मोलाचा वाटा आहे. सध्या कृषी क्षेत्र बदलत्या हवामानाला सामोरे जात आहे. शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे नमूद करुन, मंत्री मुंडे यांनी मानद डॉक्टर पदवी मिळालेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., राजेंद्र बारवाले, विलास शिंदे व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्यावतीने कुलगुरु डॉ. पाटील यांच्या हस्ते राधाकृष्ण विखे पा., राजेंद्र बारवाले व विलास शिंदे यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद पदवीने सन्मानित केले. यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले.

प्रमुख पाहुणे डॉ. आर.एस. परोदा म्हणाले, नवनवीन ज्ञान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा, जेणेकरुन जीवनात यशस्वी व्हाल. 2030 पर्यंत देशात एकही गरीब नसणे, कोणीही उपाशी राहणार नाही, हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. वातावरणातील बदलाला सामोरे जाणे, पाणी व जमीन या नैसर्गिक संसाधनांचा र्‍हास थांबविणे, सामाजिक-आर्थिक विषमता दुर करणे ही मोठी आव्हाने आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पायाभुत सुविधांचा विकास, नवीन तंत्रज्ञान, पारदर्शक योजना व संस्थापक यंत्रणा या चार मुद्यांवर काम करावे लागेल, असे सांगत, जी.एम. पिके, सेंसर्स आधारीत उपकरणे, बाजारपेठांची निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्या व स्वयंसहाय्यता गट याबाबी योग्य दिशेने नेण्यास मार्गदर्शक ठरणार असल्याचे ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. शेतकर्‍यांना उपयोगी ठरणार्‍या 1774 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 295 वाणांची निर्मिती, 46 कृषी अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली. भविष्यात शेती डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत असणार आहे. विद्यापीठ संशोधनामध्ये ड्रोन, आय.ओ.टी. व सेंसर्सवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. या संशोधनामुळे शेतकर्‍यांना शेती करणे सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, माजी राज्यमंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. एम. सी. वार्ष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसन लवांडे, डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले, माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. हरी मोरे, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व डॉ. भगवान देशमुख यांनी केले.

मंत्री विखे यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी
जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध क्षेत्रांमधील नामवंतांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी मंत्री विखे यांचा सन्मान होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

6895 जणांचा पदवीने झाला सन्मान..!
म. फुले कृषी विद्यापीठाकडून 73 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 300 पदव्युत्तर पदवी तर 6,522 विद्यार्थ्यांना पदवी अशा एकुण 6,895 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात सन 2022-23 मध्ये बी.एस्स.सी. (कृषी) पदवीत प्रथम पुजा नवले, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम ऐश्वर्या कदम, कृषी अभियांत्रिकीत प्रथम गौरी चव्हाण यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT