शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : समाज माध्यमावर शिर्डीत राहणार्या मुला-मुलीच्या चॅटिंगमुळे मुलीच्या भावाने संशयातून त्या तरुणास निर्जनस्थळी नेले आणि त्याच्या मित्राने त्याच्यावर धारधार शास्त्राने हल्ला केला. जखमी असलेला तरुणांची प्रकृती सध्या स्थिर असून खुनाचा प्रयत्न करणारे या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात सुदर्शन मुरमुडे यांनी तक्रार दाखल केली असून त्या तक्रारी असे म्हटले आहे की, शिर्डीतील कालिकानगर भागात राहत असून माझ्या गल्लीच्या पाठीमागील गल्लीतल्या मुलींसमवेत चॅटिंग करत होतो.
ही बाब तिच्या घरच्यांना समजल्यावर त्या मुलीचे आई- वडील माझ्या आईकडे आले. त्यावर त्यांनी माझ्या आईला सांगितले की, 'तुमचा मुलगा आमच्या मुलीशी चॅटिंग करतो'. त्यानंतर त्या मुलीचे मामा सोमवंशी हे सुद्धा ह्याच विषयाबाबत मला भेटले. मी त्यांना सांगितले आम्ही फक्त समाज माध्यमावरील मित्र आहोत. तुम्ही म्हणत असाल तर तेही बंद करतो'.
यानंतर त्या मुलीचा भाऊ शुभम घोडे मला भेटला. आपण हा विषय बसून मिटून टाकून त्यासाठी सागर पवार यास बोलावून घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी मला साई निवारा येथे नेले. त्यावेळी तिथे असणारा शुभमच्या मित्राने माझ्या कानामागे मारली. त्याचवेळी शुभमने माझ्या छातीवर धारदार शास्त्राने वार केले. त्यानंतर त्याच्या मित्रानेही चाकू काढून माझ्यावर वार केले.
जखमी अवस्थेत तेथून पळ काढला. ह्या अवस्थेत असतांना माझ्या नातेवाईकांना फोन घडलेली हकीकत सांगितली. त्यांनी मला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडालेली आहे.