नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा – खडका रस्ता असून नसल्यासारखा झाला आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहेत. खडका रस्ता खड्ड्यांचा रस्ता बनला आहे. त्यामुळे खडका रस्त्याची साडेसाती कधी संपणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नेवासा -खडका रस्त्यावर अनेक वर्षांपासून पूलाच्या उंचीचा प्रश्न भिजत पडलेला होता. परंतु मध्यंतरी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने मार्केट यार्ड जवळील पुलाची उंची वाढल्याने रहदारीचा मार्ग सुकर झालेला आहे.
या रस्त्यावरून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी नेवाशातून खडका मार्ग सर्वाना जाण्यासाठी जवळचा व सोपा मार्ग आहे. नेवासा मार्केट यार्ड ते खडका हा पाच किलोमीटरचा रस्ता नागरिकांच्या सतत तक्रारीवरून टप्प्या टप्प्यात काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आता हा रस्ता असून नसल्यासारखा झालेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हा खड्डेमय रस्ता बनला आहे. औरंगाबाद, देवगड, खलाल पिंप्री, मडकी, शिरसगाव, सलाबतपूर, वरखेड, गंगापूर आदि भागात जाण्यासाठी या मार्गावर लोकांची वर्दळ असते. परंतु रस्त्याचे मजबुतीकरण होण्यास सतत टाळाटाळ होत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली आहे.
या खडका रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. लोकांना चालतांना कसरत करावी लागते. या रस्त्यावर सतत लहान मोठे अपघात होत आहेत. तातडीने खडका – नेवासा रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवानेते अनिल ताके व सहकार्यांनी दिला आहे.