अहमदनगर

आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास अलर्ट ठेवा: आमदार आशुतोष काळे

Sanket Limkar

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे, त्यामुळे गावा-गावांचा संपर्क तुटणे, वादळ, अतिवृष्टीमुळे विजेचे खांब कोसळणे, अशा आपत्ती निर्माण होतात. अशा आपत्ती काळात मदतीसाठी तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याव्दारे 24 तास नागरिकांना तातडीने मदत कशी पुरविता येईल, याची काळजी घ्या, असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला केले.

कोपरगावच्या तहसील कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार विकास गंबरे, नायब तासिलदार सातपुते, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कोपरगाव नगरपरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप, ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी,शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गुट्टे, उपविभागीय जलसंधारन अधिकारी प्रतिभा खेमनर, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, आरोग्य अधिकारी गायत्री कांडेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मेटकरी, भूमी अभिलेख उपअधिक्षक संजय भास्कर आदी उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करावे!

दुर्घटना टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून दुर्घटनामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी दक्षता घ्या.आपत्तीच्या काळात झालेल्या नुकसानीचे संयुक्तरित्या पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करावा. सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या काळात आपल्या जबाबदारीचे गांभीर्याने पालन करून सर्व विभागाच्या अधिकार्यांनी समन्वयाने काम करावे.

प्रशासनाला केलेल्या सूचना

अतिवृष्टी आणि पुरामुळे संपर्क तुटणार्‍या गावांना पुरेशा प्रमाणात दैनंदिन वस्तूंचा पुरवठा, आवश्यक औषधे तसेच धान्यपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करावे. अर्धवट राहिलेल्या विकासकामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी आपल्या हद्दीतील रेंगाळत पडलेली कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत, यासाठी जलस्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी.

महावितरणने नियोजन करावे

पाऊस, वादळाच्या प्रसंगी पूर परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत होतो, अशावेळी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने प्रभावी नियोजन करावे. विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तत्काळ दुरुस्त करून घ्यावीत. नाल्यांच्या सफाईची कामे तातडीने पूर्ण करून जीर्ण इमारती आणि पुलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी सीमांकन करून पूर प्रतिबंधक समितीची स्थापना करावी.

आपत्कालीन हेल्पलाइन आवश्यक

आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत, बचाव पथकांचे प्रशिक्षण, बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करुन हवामान खात्याकडून वेळोवेळी येणारे धोक्याचे इशारे प्राप्त होताच योग्य माहिती सर्वदूर जलद गतीने पोहोचविण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा. मतदार संघात ज्या ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाण्याची गरज असेल अशा सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करा.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT