अहमदनगर

काष्टी आदर्श मॉडेल बनविणार : सरपंच साजन पाचपुते

अमृता चौगुले

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : गेली चाळीस वर्षे गावात कोणी काय केले, हे माहित नाही. पण, ग्रामस्थ अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन एक वर्षात काष्टी हे गाव आदर्श मॉडेल बनविणार असल्याचे सरपंच साजन पाचपुते यांनी सांगितले. काष्टी ग्रामपंचायतीने 15 वा वित्त आयोग सन 2023- 24 चा आराखडा बनविण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते.

सरपंच साजन पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे कामकाज पार पडले. यामध्ये शासनाच्या संकल्पावर चर्चा करण्यात येऊन स्वच्छ आणि हरित पंचायत, पायाभूत सुविधायुक्तपंचायत, बालस्नेही पंचायत, या तीन संकल्पनांवर 1 वर्षात प्रभावीपणे काम करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली. वृक्ष लागवड करून ट्रीगार्ड बसविणे, स्वच्छता टेंडर, घनकचरा विलगीकरण, पाणीपुरवठा सुरळीत करणे या बाबींवर प्रामुख्यानेे ग्रामसभेने निर्णय घेतले.

ज्येष्ठ नेते कैलास पाचपुते यांनी दशक्रिया विधी ठिकाणाचे सुशोभीकरण करणे, स्मशानभूमीत वृक्ष लागवड करून संगोपन करणे, याबाबी सूचविल्या. सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते यांनी पाणीपुरवठ्यासाठी नवीन वितरण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनासाठी चांगल्या एजन्सीचे मार्गदर्शन, परिक्रमा समोरील लोकवस्तीत नवीन गटार , अजनुज रोडला गटार, जामदार मळा येथे घोड धरणातून बंधारा भरणे, तसेच वजन व मापे या विभागामार्फत वजन व मापे तपासण्यासाठी येणार्‍या एजन्सीकडून शासकीय फी व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी केली जाते.

याबाबत ग्रामसभेचे वेधले. तसेच युनियन बँक, महाराष्ट्र बँक या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याची सूचना मांडली. तसेच, गावातील वेगवेगळ्या चौकातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा झाली. अ‍ॅड. विठ्ठलराव काकडे यांनी शेतकर्‍यांचा वीजप्रश्न मार्गी लावण्याची सूचना मांडली. तसेच, काही गावातील ग्रामस्थांवर श्रीगोंदा पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगितले. त्यावर गुन्ह्याची सत्यता न तपासता निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल जात असल्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याबाबत ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केला.

ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी नवसंकल्पना व पंधरावा वित्त आयोग सन 2023-24 ची सविस्तर माहिती दिली. ग्रामसभेसाठी सदस्य दादासाहेब कोकाटे, विशाल दांगट, सविता पाचपुते, शीतल ढमे, मालन गवते, सुभाष घोलवड, रेगे काका, दत्ता पाचपुते, अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नंदा पाचपुते, चांगदेव पाचपुते, जितेंद्र पाचपुते, रवींद्र दांगट, सर्जेराव पाचपुते उपस्थित होते. चांगदेव पाचपुते यांनी आभार मानले. ग्रामसभेला उपसरपंचासह नऊ सदस्य गैरहजर होते.

SCROLL FOR NEXT