अहमदनगर

Nagar : काष्टीचा बाजार अवैध धंद्यांच्या विळख्यात

अमृता चौगुले

काष्टी : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंदा तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या काष्टी या मोठ्या महसुली गावातील छत्रपती शिवाजी महाराज उपबाजारातील आठवडे बाजारात सुरू असलेल्या विविध जुगारांसह अवैद्य धंदे बंद करा, अशी मागणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्याला याबाबत समितीतर्फे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे, की काष्टीचा आठवडे बाजार जागा कमी पडत असल्याने दर शनिवारी तीन ठिकाणी भरतो. या बाजारला राज्याच्या विविध भागांतून तसेच वेगवेगळ्या राज्यांतून शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक गायी, बैल, म्हशी यांसह विविध जनावरे, भाजीपाला, लिबू, खरेदी-विक्रीसाठी एक दिवस आधीच येतात.

त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असते. काही अज्ञात व्यक्ती बाजारला आलेल्या लोकांना आपल्या मोहात अडकवून जुगार खेळायला लावतात आणि आर्थिक लूट करून फसवितात. अशा फसवणार्‍यांची बाजारात मोठी टोळी सक्रिय आहे. हा बाजार भरतो तेथेच शेजारी स्वतंत्र पोलिस चौकी आहे. परंतु पोलिसांच्या आशीर्वादानेच सर्व धंदे तेजीत आहेत, असा आरोप करत, वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची विनंती बाजार समितीने पत्रात केली आहे.

काष्टीसह श्रीगोंदा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंद्यांवर आमच्या पथकाच्या कारवाया सुरू असून काष्टी बिट व परिसरात अवैध धंद्यांबाबत सविस्तर माहिती घेऊन करवाई करणार आहोत. कोणालाही पाठीशी घालणार नाही.
                                                   – ज्ञानेश्वर भोसले, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदा

पोलिसांना मलिदा मिळत असल्याची चर्चा
अवैध दारूविक्री करणारे, तसेच ढाबे, हॉटेलवर विनापरवाना दारू विकणारे व्यावसायिक 'आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही' असे छातीठोकपणे सांगतात. कारण वसुलीबहाद्दरांच्या माध्यमातून पोलिसांना महिन्याला मोठा मलिदा देत असल्याचे हे व्यावसायिकच सांगत असल्याची चर्चा लोक करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT