कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची आज (दि.11) निवड होणार आहे. पदांवर कोणाची वर्णी लागणार, कोणता गट बाजी मारणार, दैवी चिठ्ठी की स्पष्ट बहुमत, घोडेबाजार होणार का, आमदार रोहित पवार की आमदार राम शिंदेंचे वर्चस्व, याविषयी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहावयास मिळाला. दोघांनीही निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
फोडाफोडीच्या राजकारणाने निवडणूक सर्वत्र गाजली. आमदार शिंदे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना फोडून आमदार पवार यांना धक्का दिला. मात्र, कोणतीही परिस्थिती अनुकूल नसतानाही आमदार पवार यांनी या निवडणुकीत कौशल्य वापरून आमदार शिंदे यांना स्पष्ट बहुमत मिळू दिले नाही. दोघांनाही समाज म्हणजे प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सभापती निवडीसाठी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला देखील उधाण आले आहे.
भाजपचे सदस्य सुरक्षित स्थळी
फेर मतमोजणीचा निकाल जाहीर होताच, त्याच दिवशी रात्री भाजपचे सर्व नवनिर्वाचित संचालक तीर्थयात्रेला निघून गेले. फोडाफोडीचे राजकारण होऊ नये व सदस्य सोबत राहावेत, यासाठी भाजपने आपल्या संचालकांना एकत्र बाहेर नेले आहे. भाजप शिवसेना व उद्धव ठाकरेंची शिवसेना, असे तिन्ही पक्ष एकत्र असून त्यांचे आठ संचालक एकत्र आहेत. एक संचालक लहू ओतारे आजारी असल्यामुळे रुग्णालयात आहेत. ते मतदानाला येणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीचे सदस्य उशिरा तीर्थयात्रेला
बाजार समितीचा निवडणूक निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीने सर्व नवनिर्वाचित नऊ संचालकांना तीर्थयात्रेला नेले होते. परंतु फेर मतमोजणीचा आदेश झाल्यानंतर ते सर्व संचालक परत आले. त्यानंतर हे सर्व संचालक येथेच होते. शुक्रवारी हे सर्व संचालक पुन्हा एकत्र बाहेर गेले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे कट्टर समर्थक वसंत कांबळे हे या संचालकांबरोबर गेलेले नाहीत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण आठ संचालक सध्या एकत्र आहेत. वसंत कांबळे हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व आयुधांचा वापर
निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधक यांनी सर्व आयुधांचा वापर केला आहे. यामुळे संचालकांच्या निवडणुकीपासून ते आता सभापती व उपसभापतीच्या निवडीपर्यंत कमालीचा संघर्ष व शह आणि काटशह यांचे राजकारण कर्जतकरांना पाहावयास मिळाले आहे.
निवडणूक प्रक्रिया अशी होणार
नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती दुपारी 1 ते 1.30 पर्यंत. छाननी 1.30 ते 1.45. वैध यादी प्रसिद्धी 2 वाजता. अर्ज माघार घेण्यासाठी 2.15 पर्यंत मुदत राहील. अंतिम उमेदवारी 2.20 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. आवश्यक वाटल्यास मतदान प्रक्रिया 2.25 ते 3 पर्यंत. आवश्यकता असल्यास मतमोजणी प्रक्रिया 3 ते 3.15 व निवडून आलेल्या पदाधिकार्यांचा निकाल दुपारी 3.30 वाजता जाहीर करण्यात येईल.
दैवी चिठ्ठी की फोडाफोडी?
दोन्हीही गटांना समान जागा असल्यामुळे कोण बाजी मारणार याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. सदस्य संख्या समान आहे. त्यामुळे यामध्ये फोडाफोडी होणार की, फूट न पडल्यास दैवी चिठ्ठी कोणाच्या नावाची निघणार, याविषयी चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा :