अहमदनगर

अंमळनेर, करजगाव परिसराला वादळाचा तडाखा

अमृता चौगुले

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील मुळा नदीकाठच्या अमंळनेर, करजगाव या गावांना गुरुवारी रात्री 8 वाजता पुन्हा वादळाने मोठा तडाखा दिला. त्यामुळे अनेक घरांच्या छताचे पत्रे उडून संसार उघड्यावर आला.तसेच भिंत व लोखंडे अँगल अंगावर पडून सातजण जखमी झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून नगर जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळाचं तांडव सुरू असतानाच गुरुवारी (दि. 20 ) रात्री आठ वाजता नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या अंमळनेर, करजगाव परिसराला वादळाने मोठा तडाखा दिला.

या वादळाची तीव्रता मोठी असल्यामुळे 30-40 घरांवरील पत्रे अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पडले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यात अजय आयनर, खंडू शिंगटे, शिवाजी सुपनर, राहिबाई आयनर, राजेंद्र पाडळे, राहुल पवार, गंगाराम आयनर, शैनेश्वर माकोने, लक्ष्मण आयनर, अच्युत घावटे, संदीप तमनर, तुकाराम पवार, दिनकर पवार, दत्तात्रय भास्कर, किसन बाचकर, शिवाजी आयनर या अमळनेर येथील नागरिकांच्या घरांचे पत्रे उडाले. करजगाव येथील नारायण कंक, संजय पवार, भाऊसाहेब टेमक, दिनकर टेमक, खंडू मदने, सतीश फुलसौंदर, मयूर पवार, सुभाष जगताप, दादासाहेब कदम यांचेही संसार घरांवरी पत्रे उडाल्याने उघड्यावर आले.

भिंत अंगावर पडून तसेच घरासाठी वापरलेले अँगल अंगावर पडून सातजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये छायाबाई शिंगाडे या महिलेचा हात मोडला असून, खंडू शिंगाटे यांच्या कमरेला जबर मार लागला आहे, अजय आयनर, सोनाली आयनर, नानासाहेब बाचकर, मनूबाई आयनर हे जखमी झाले आहेत. झैाड पडल्याने संदीप तमनर यांची चार जनावरे जखमी झाली आहेत.

या भागातील विजेचे खांब जमीनदोस्त झाले असून, या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच 500 हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील गडाख यांनी संयुक्त पाहणी केली. तहसीलदारांनी शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले.

गडाख यांच्याकडून मदतीचे आश्वासन
संसार उघड्यावर आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गडाख यांनी मदतीचे आश्वासन दिले. यावेळी अमळनेरचे तलाठी बाबासाहेब कराळे,ग्रामसेविका सविता भाचकर यांच्यासह आजी-माजी सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT