अहमदनगर

मढी : कानिफनाथ महाराज की जय! घोषणांनी परिसर दुमदुमला

अमृता चौगुले

मढी : पुढारी वृत्तसेवा :  येथे फुलोरबाग यात्रेनिमीत्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो कावडीच्या पवीत्र जलाने चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीस जलाअभिषेक करण्यात आला. यावेळी 'गंगामाई की जय, हरहर महादेव, अलख निरंजन, चैतन्य कानिफनाथ महाराज की जय,' अश्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कानिफनाथांचे निशाण भेट शांतते होऊन कावड मिरवणूक उत्साहात पार पडली. निशाण भेटीप्रसंगी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून आतषबाजी करण्यात आली. फुलरबाग यात्रेचा शेवटचा टप्पा मढी निवंडुगे गावाच्या हद्दीत साजरा होतो. मढी येथे समाधी सोहळ्यास येण्यापूर्वी चैतन्य कानिफनाथ विश्रांतीसाठी जेथे थांबले, त्या जागेवर फुलरबाग यात्रा भरते. अनेकजण नवसाची पूर्तीसाठी फुलोरबाग यात्रेस हजेरी लावतात.

पैठण, शेवगाव, अमरापूर, साकेगाव, हत्राळ या मार्गे सुमारे 60 किलोमीटरची पायपीट करत निवडुंगे व मढी येथे सोमवारी सायंकाळी फुलरबागेत रात्रीच कावड भाविक दाखल झाले होते. निवडूंगे – मढी, तिसगाव -मढी, मायंबा – मढी रस्तावर वाहानांची कोंडी झाली होती. मढीकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले. दुपारी तीन वाजता वाजत-गाजत मानाचे निशाण कावडीची मिरवणूक फुलरबागेतून कानिफनाथ मंदिराकडे निघाली. मढी- पैठण, कासार पिपंळगाव, माळी बाभुळगाव, सुसरे गावांतील निशाण मिरवणुकीत अग्रभागी होते. निशाणभेटीसाठी कानिफनाथांची पालखी गडावरून निघाली.

विविध गावच्या कावडींचे जलाभिषेक सुरू झाला. सायंकाळी 5.30 वाजता गडावरून आलेली नाथांची पालखी व फुलोरबाग येथून आलेल्या मानाच्या पाच कावडींचे निशाणाची भेट गावकुसाला लक्ष्मीआई मंदिराजवळ झाली. यावेळी 'गंगामाई की जय, हरहर महादेव, अलख निरंजन, चैतन्य कानिफनाथ महाराज की जय,' अश्या घोषणांनी परिसर दुमदुमला. परतीच्या पालखी मिरवणुकीत सुवासिणींनी ओवाळणी केली अन् फेरधरत नृत्य केले.

कावडी मिरवणुकीचा जल्लोष सूर्यास्तापर्यंत सुरू होता. डफ, ढोल, झांज, संबळ, अशा वाद्यांचे लयबद्ध गजराने मिरवणुकीची रंगत वाढली. यात्रा निशाण भेट सोहळ्यानंतर पुन्हा बहरली. अनेक गांवाच्या भाविकांनी माहाप्रसादाचे वाटप केले. देवस्थान समितीने कावड यात्रेची उत्कृष्ट नियोजन केल्याने यंदा वाद झाले नाहीत. स्थानिक कावडीवाल्यासाठी स्वतंत्र रांग, तर अन्य भाविकांसाठी दर्शनबारीतून सुविधा करण्यात आली. विश्वस्त मंडळ सर्व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुलांना कावडीसमोर झोपवत नवसपूर्ती
लहान मुलांना कावडीसमोर झोपविण्याची नवसपूर्ती केली. फुलोरबाग यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा असून, पालखी मार्गावर अनेक भाविक आपल्या लहान मुलांना मिरवणुकीपुढे झोपवितात. कावडीवाले भाविक मुलांना ओलांडून पुढे जातात. नाथांच्या पालखी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

यात्रेसाठी यांनी घेतले परिश्रम
निशाण भेटदरम्यान मढी देवस्थाान अध्यक्ष बबन मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, श्यामराव, डॉ. विलास मढीकर, नवनाथ मरकड, माजी विश्वस्त डॉ. रमांकात मडकर, पोलिस निरीक्षक संतोष मुटुकुळे, ग्रामस्थ भाग्येश मरकड, अशोक मरकड, बाळासाहेब मरकड, चंद्रभान पाखरे, ग्रामसेवक विठ्ठल राजळे, यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बंजारा पांरपरिक नृत्य सादर
अनेक भाविकांचे कुलदैवत चैतन्य कानिफनाथ असल्याने सहकुंटुब येऊन समाधीचे दर्शन, फुलोरबाग यात्रेतील खाद्या संस्कृती, विविध प्रकारच्या खरेदीमध्ये भाविक रात्रभर जागे असतात. यात्रेनिमित्त आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. आंध्रातील बंजारा भाविकांनी मिरवणुकी पुढे पांरपरिक नृत्य सादर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT