अहमदनगर

मढी : कानिफनाथांचा पालखी सोहळा रंगला; हजारो भाविकांनी गर्दी

अमृता चौगुले

मढी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र मढी येथे तिसर्‍या श्रावणी शुक्रवारनिमित्त कानिफनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद व कानिफनाथांचा जयजयकाराने मंदिर परीसर दुमदुमून गेला होता. मढीच्या पालखी सोहळ्याकडे जिल्ह्यातील श्रावणातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून पाहिले जाते.

प्रत्येक श्रावणी शुक्रवारी मढी गावातून नाथांची पालखी व पंचधातू घोड्याचीची वाजतगाजत मिरवणूक निघते. पवित्र श्रावण महिन्यातील नाथांचा वार म्हणून शुक्रवारी हा पालखी सोहळा निघतो. तिसर्‍या शुक्रवारी मात्र पालखी सोहळ्याला यात्रेचे स्वरूप येते. भांगरवाडी, लोणावळा, आळंदी, जळगाव, पुणे, नाशिक, मावळ, ठाणे, मोशी यासह विविध गावांतील पायी दिंडी व पालख्या वाजतगाजत मढी येथे कानिफनाथांच्या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.दिवसभर अनेक भाविकांनी कानिफनाथाच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

पुणे येथील भाविकांनी कानिफनाथ संजीवन समाधी मंदिराचा गाभारा, सभामंडप, कानिफनाथांचे मुख्य मंदिर, तसेच सर्वच ठिकाणी विविध रंगांच्या आकर्षक फुले व फुग्यांनी वैशिष्ट्यपूर्ण केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती. देवस्थान समितीच्या वतीने पालखी मार्गावर सुशोभीकरण व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

गुरूवारी रात्रीपासूनच मढी येथे भाविकांनी गर्दी केली होती. चिंचेचा बाग, यात्रा मैदान, गणेश चौक भक्तनिवास परिसर येथील वाहनतळ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. शुक्रवारी रात्री महाआरतीनंतर नऊ वाजता कानिफनाथांच्या मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.
या मिरवणुकीत कानिफनाथांचा पंचधातूचा घोडा असतो.

पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी व मढी ग्रामस्थांनी शांततेत दर्शन घेतले. मावळ व नाशिक परिसरातील भाविकांच्या झांज व बँड पथकाने मंत्रमुग्ध केले. मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त शामराव मरकड, रवींद्र आरोळे यांनी भाविकांचे स्वागत केले. देवस्थानचे व्यवस्थापक तथा प्रभारी कार्यकारी अधिकारी संजय मरकड व इतर कर्मचार्‍यांनी भाविकांना सेवा देत परिश्रम घेतले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT