अहमदनगर

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासमोर काळे यांचे आज ढोल बजाओ आंदोलन

अमृता चौगुले

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रवेश द्वारा समोर आज (दि. 28) रोजी दुपारी 3 वाजता गैरहजर डॉक्टर व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन, त्यांना बडतर्फ करण्यासह वैद्यकीय अधीक्षकांनी मुख्यालय सोडल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे ढोल बजाव आंदोलन व सत्याग्रह करणार आहेत.

दरम्यान, काळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत पत्र पाठविले आहे. काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी ग्रामीण रुग्णालयास अपरात्री भेट दिली. महिला कर्मचार्‍यास अपशब्द वापरले, म्हणून पोलिसात गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कर्मचार्‍यांनी सत्याग्रह केला. तहसीलदारांनी गुन्हा केला असेल तर तो दाखल होऊन बडतर्फ झाले पाहिजे, परंतु नाण्याला दोन बाजू असतात. तहसीलदार ग्रामीण रुग्णालयात अपरात्री भेटीस गेले असता त्यांच्या वाहन चालकाने संभाषणासह दवाखान्यातील कर्मचार्‍यांसोबतचे दोन व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत केले.

एका चित्रफितीमध्ये दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एका कर्मचार्‍यास डॉक्टर किंवा नर्स असल्याबाबत प्रश्न विचारला. त्या कर्मचार्‍याने नर्सला मोठ्या आवाजात हाका मारल्या, परंतु नर्स रूममध्ये दार बंद करून झोपल्या होत्या. तहसीलदारांनी रुग्णांना देखील त्रास दिला, असे समाज माध्यमांवरील बातम्यात ऐकले, वाचले. म्हणजे रुग्णालयात रुग्ण असताना कर्तव्यात कर्मचारी रात्रपाळीत झोपले कसे. ते देखील खोलीचे दार बंद करून त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे, त्याची दखल कोण घेणार, असे काळे म्हणतात.

तहसीलदारांनी महिला कर्मचार्‍यास ड्युटी रजिस्टर मागितले. त्यात ग्रामीण रुग्णालयात 52 चा स्टाफ असताना, रात्री संपूर्ण दवाखाना केवळ एकाच नर्सच्या भरवश्यावर सोडल्याचे चित्रफितीत स्पष्ट दिसते. कर्तव्यात असलेले इतर डॉक्टर व स्टाफ दवाखान्यात नसल्याचे तहसीलदारांनी जनतेच्या निदर्शनास आणून दिले. रात्री त्यांनी वैद्यकिय अधिक्षक यांना फोन केल्याचे चित्रफितीत स्पष्ट दिसते.

शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून डॉक्टरांसाठी आवारात निवास बांधले आहे, तर डॉक्टर आवारात का निवास करीत नाही. रात्री वैद्यकिय अधिक्षकांनी मुख्यालय कसे सोडले. रात्री कर्तव्यात, पण गैरहजर कर्मचारी, डॉक्टर तसेच कर्तव्यात असताना झोपलेल्या कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबीत करावे, असे काळे म्हणाले.

रुग्णालयातील घटनेची शहानिशा व्हावी : पुंडे
ग्रामीण रुग्णालयात झालेले स्टिंग ऑपरेशन व त्या प्रत्युत्तरा दाखल केलेली विनयभंगाची तक्रार या घटनेची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करावी. याप्रकरणाची शहानिशा व्हावी. कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल दत्ता पुंडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

महिलांवर खरोखर अत्याचार झालेला असल्यास त्यांनी गप्प न बसता पुढे येऊन तक्रार करावी. ज्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा बसेल, परंतु कोणाच्या तरी इशार्‍यावर चुकीच्या तक्रारी दाखल करुन महिलांनी आपला वापरही होऊ देता कामा नये, अन्यथा खरोखर अन्याय झालेल्या पिडीतेबाबतही समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. 'लांडगा आला रे आला' या म्हणीप्रमाणे खर्‍या पिडीत महिला मात्र यात भरडल्या जातील, असे पुंडे म्हणतात.

फौजदारी गुन्ह्यासह बडतर्फीची केली मागणी
आज (दि. 28) रोजी दुपारी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेश द्वारासमोर गैरहजर डॉक्टर, कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा व बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी ढोल बजाव सत्याग्रह करणार असल्याचे संजय काळे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT