अहमदनगर

नगर : जेऊरच्या सरपंचपदी ज्योती तोडमल

अमृता चौगुले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊरच्या सरपंचपदी ज्योती बाबासाहेब तोडमल यांची निवड झाली. गुरुवारी (दि. 16) सरपंच निवडीचा कार्यक्रम आयोजिला होता. राजश्री मगर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले होते. राजश्री मगर, ज्योती तोडमल, वंदना विधाते, वैशाली पाटोळे असे चार अर्ज दाखल झाले होते. राजश्री मगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तीन उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

11 ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक हात वर करून घेण्यासाठी अर्ज दिला होता. परंतु, इतर सदस्यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये ज्योती तोडमल यांना दहा मते मिळाली, तर वंदना विधाते यांना पाच, वैशाली पाटोळे यांना दोन मते मिळाली. ज्योती तोडमल यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. ज्योती तोडमल यांच्यासोबत 11 ग्रामपंचायत सदस्य सहलीला गेले होते. याच 11 जणांनी मतदान हात वर करून घेण्यासाठी लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दिला होता. प्रत्यक्षात तोडमल यांना दहा मते मिळाल्याने एक मत कोणाचे फुटले याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरू झाली.

जेऊर ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले गटाची सत्ता आहे. कर्डिले यांनी निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना एकत्र आणत सत्ता स्थापन करून राजश्री मगर यांना सरपंचपद दिले होते. त्यामुळे आता सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. परंतु, सरपंचपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी जीवन सुतार, तलाठी सुदर्शन साळवे, ग्रामसेवक आटकर यांनी काम पाहिले.

नूतन सरपंचासमोरील आव्हाने
नूतन सरपंचासमोर गावामध्ये असणार्‍या समस्यांचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पाणी, वीज, घनकचरा, गटार, रस्ते, आरोग्य, पथदिवे, शौचालय युनिट, बंद हायमॅक्स, वाड्यावस्त्यांवरील रस्ते अशा अनेक समस्या गावासमोर आहेत.

सर्व गट-तट बाजूला ठेवून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली गाव विकासासाठी काम करणार आहे. तसेच, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येईल. सर्वांनी गाव विकासासाठी सहकार्य करावे.
-ज्योती तोडमल, नूतन सरपंच, जेऊर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT