नगरः पुढारी वृत्तसेवा : गुलमोहर रोडवरील टाटा क्रोमा मॉलमधून आयफोनसह स्मार्टवॉच आणि हेडफोनची चोरी झाली आहे. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून मॉलमध्येच एका मोबाईल कंपनीकडून प्रोमोटर म्हणून काम करणार्या तरुणाने चोरी केली. याबाबत शुभम नरेंद्र पवार (रा. ममता गॅस एजन्सीजवळ, गुलमोहर रोड, नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुमित अरुण उगार (रा. म्हाडा वसाहत, प्रेमदान हडको, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या चोराचे नाव आहे.
सुमित हा मॉलमध्ये एका कंपनीकडून प्रोमोटर म्हणून काम करीत होता. 2 जानेवारी रोजी सुमितने मोबाईल त्याच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पिशवीत टाकला. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून गेला. सुमितवर संशय आल्याने त्याला बोलावून विचारले असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. 65 हजार 999 रूपये किमतीचा आयफोन मोबाईल, 3 हजार 398 किमतीचे फायर बोल्ट कंपनी स्मार्ट वॉच, 2 हजार 499 रुपये किमतीचे स्मार्ट वॉच, 14 हजार 495 रुपये किमतीचे हेडफोन्स् असा 86 हजार 391 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. तोफखाना पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.