नगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जबरी चोर्या, घरफोड्या, रस्ता लूट, दरोडा, दरोड्याची तयारी अशा घटनांमध्ये वाढ झाली असली, तरी स्थानिक गुन्हे शाखेनेही (एलसीबी) गुन्हे उघडकीस आणण्याचा धडाका लावला आहे. गेल्या दहा महिन्यांत (1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर) एलसीबीने एकूण 330 गुन्हे उघडकीस आणले आहेत, तर 474 जणांना जेलवारी घडविली आहे. त्यात सुमारे दहा कोटी 65 लाख 93 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दरोड्याचे प्रमाण जास्त होते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये दरोड्याचे गुन्हे करणार्या टोळ्यांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त केल्याने दरोड्याचे प्रमाणात काही अंशी कमी झाले. परंतु, रस्ता लूट, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लूट, शेती पिकांची चोरी, अपहरण, मंदिर फोडून चोरी अशा गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दहा महिन्यांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रस्ता, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील टोळ्या गजाआड केल्या. त्यामुळे काही अंशी गुन्हेगारीला चाप बसला.
नगर शहरातील डॉ. वैद्य यांचे घर फोडून 21 लाख 20 हजारांचा ऐवज लांबविल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी सागर जुन्नी याच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. राहुरी तालुक्यात व्यापार्याला अडवून लुटल्याच्या गुन्ह्यात योगेश खरातसह आठ जणांना पकडले. त्यात एका पोलिस अंमलदाराचाही समावेश होता. त्यांच्याकडून 10 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कानडगाव येथे घरात घुसून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून चोरीच्या गुन्ह्यात शोएब शेख यासह सात जणांना अटक केली; तर वडाळा बहिरोबा (ता. नेवासा) येथे शेतातील डाळिंब चोरीच्या गुन्ह्यात साईनाथ आहिरे याच्यासह आठ जणांना पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडून 4 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. मंदिराची दानपेटी फोडल्याचे पोलिसांनी सुमारे आठ गुन्हे उघडकीस आणून आरोपींना गजाआड केले. स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांना जेलमध्ये टाकले आहे. दरम्यान, चोर्या व घरफोड्या रोखण्याचे पोलिसांसमोरील आव्हान तरीही कायम आहे.
विविध कारवायांत 34 गावठी पिस्तुले जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून गावठी पिस्तूल बाळगणार्या 30 जणांना अटक केली. याबाबत 17 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल 34 गावठी पिस्तूल व 75 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. एकूण सोळा लाख 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दरोडा, रस्ता लूट, जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील बहुतांश टोळ्यांना अटक करण्यात यश आले आहे. मात्र, चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर
पावणेदोन कोटींचा गुटखा जप्त
राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखूला बंदी आहे. तरी जिल्ह्यात राजरोस गुटखाविक्री होते. स्थानिक गुन्हे शाखेने दहा महिन्यांत 51 ठिकाणी छापे टाकून 109 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोटी 83 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात विविध कंपन्यांचा गुटखा व वाहनांचा समावेश आहे.