शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : ताजनापूर योजनेत 9 गावांचा समावेश करून त्यासाठी निधी देण्याची मागणी अॅड. शिवाजीराव काकडे यांच्यासह शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समक्ष भेटून केली. जायकवाडी जलाशयाच्या पाण्यासाठी जनशक्ती मंचचे अध्यक्ष अॅड काकडे, माजी जि.प. सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह 9 गावांच्या शेतकरी शिष्टमंडळाने मुंबई येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताजनापूर योजना संदर्भात भेट घेतली. या भेटीत ताजनापूर टप्पा 1 ला मंजुरी देऊन त्यामध्ये 9 गावांचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. हा प्रकल्प समजून घेत प्रकल्पास मंजुरी देऊन तो पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
शेवगाव तालुक्यास जायकवाडी जलाशयाचे 3.8 टी.एम.सी. पाणी राखीव आहे. यातून ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.2 मधील 17 गावे ओलिताखाली आणण्यास 2.2 टी.एम.सी. पाणी वापरले जाणार आहे. या पाण्याची चाचणी देखील झाली आहे. उर्वरित 1.6 टी.एम.सी. पाणी हे तालुक्यातील सालवडगाव, खरडगाव, वरुर खुर्द, वरुर बुद्रुक, आखेगाव तितर्फा, आखेगाव डोंगर, मुर्शदपूर, थाटे, वाडगाव, हसनापूर या दुष्काळी गावांना मिळावे. त्यासाठी टप्पा 1 ला मंजुरी देऊन निधी द्यावा, हा कृती समिती शिष्टमंडळाने केलेल्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेस मंजुरी देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रंगनाथ ढाकणे, माणिकराव म्हस्के, लक्ष्मणराव गवळी, नामदेव ढाकणे, वामनराव जवरे, आदिनाथ लांडे, नामदेव जायभाये, आजीनाथ विघ्ने आदी उपस्थित होते.