नगर; पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँकेच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट चेअरमन म्हणून यांची बँकेच्या इतिहासात नोंद झालेली आहे. गरज नसताना केलेली 36 कर्मचार्यांची भरती तसेच अकोले, श्रीरामपूर शाखांची जागा खरेदी, फर्निचर यामध्ये लाखो रुपये त्या काळात ज्यांनी लुटून नेले, अशा शिक्षक समितीचे नेते रा. या औटी यांनी विद्यमान संचालक मंडळावर आरोप करणे हास्यस्पद आहे, अशी घणाघाती टीका गुरुमाऊली मंडळाचे पारनेर तालुका अध्यक्ष सुरेश निवडुंगे यांनी केली आहे.
निवडुंगे म्हणाले, सदिच्छा मंडळाकडून चेअरमन पद भूषवितांना सर्व नेतेमंडळींना अंधारात ठेवून ज्यांनी अवास्तव कर्मचारी भरती करून बँकेचा प्रशासकीय खर्च वाढवला. अकोले, श्रीरामपूरच्या जागा खरेदी केल्या. त्या काळात अव्वाच्या सव्वा किमतीला फर्निचर केले. अशा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांनी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळावर आरोप करणे म्हणजे चोराच्या उलटया बोंबा आहेत. सदिच्छा मंडळाची सत्ता भोगून, सदिच्छा मंडळ फोडून गुरुकुल मंडळाला साथ देणारे आणि गुरुकुलच्या काळामध्ये पदाधिकारी निवडीत देखील पैसे खाणारे म्हणून ज्यांची ओळख आहे अशा लोकांनी आमच्या संचालक मंडळाला धुडगूस घालणारे म्हणणे त्यांना शोभत नाही. त्यांनी आरोप करण्यापूर्वी स्वतचे आत्मपरीक्षण करावे.
सदिच्छा मंडळ फोडण्यासाठी ज्यांनी जीवाचे केले, सदिच्छा मंडळातून पदे भूषवून देखील गद्दार्या केल्या अशी माणसं निवृत्तीनंतर देखील आज केवीलवाणी धडपड करीत आहेत. परंतु बँकेचे सभासद सूज्ञ आहेत. गुरुमाऊली मंडळ, ऐक्य मंडळ, शिक्षक भारती, एकल मंच आघाडीला जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सदिच्छा इब्टा अभद्र युती, गुरुकुलचा काळा कारभार आणि परिषदेचे विश्वास गमावलेले उमेदवार यामुळे जिल्ह्यामध्ये बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळ,ऐक्य मंडळ,शिक्षक भारती, एकल मंच आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
'गुरुमाऊली'चा सभासदभिमुख कारभार सभासदाभिमुख कारभार आणि सात टक्के कर्ज दराने केलेली वाटचाल तसेच मागील पाच वर्षांमध्ये कर्जावरचा कमी केलेला व्याजदर, ठेवीवर दिलेले व्याज, दिलेला लाभांश यामुळे सभासद 16 तारखेला बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळ, शिक्षक भारती,एकल मंच आघाडीलाच विजयी करणार आहेत आणि भ्रष्टाचार करून थकलेल्या नेत्यांना आता आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे, असा टोला यावेळी संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मंगेश खिलारी यांनी लगावला आहे.