अहमदनगर

Lok sabha Election 2024 Results : नगरमध्ये विखेंच्या सत्तेला सुरुंग; नीलेश लंके विजयी तर शिर्डीत वाकचौरेंची लॉटरी

अविनाश सुतार

नगर; पुढारी वृत्तसेवा : सत्ता आणि आमदारकी लाथाडून नीलेश लंके यांनी भाजपचे मातब्बर नेते विखे पाटील यांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढविण्याचे धाडस केले आणि अटीतटीच्या, प्रतिष्ठेच्या, लक्षवेधी लढतीत शरद पवारांच्या या चेल्याने विखेंचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. त्यांनी अहमदनगर मतदारसंघात केवळ विजयाचा गुलाल घेतला असे नव्हे, तर भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.

एक विधानसभा व दोन लोकसभा अशा तीन निवडणुकांमध्ये पराभव पचविल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांना विजयाचा सूर गवसला. सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या लोखंडे यांचा तिसर्‍यांदा मात्र घात झाला. शिंदे आणि ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीत ठाकरे यांनी बाजी मारत शिर्डीवर आपले वर्चस्व अबाधित राखले.

विखे विरुद्ध लंके ही लढत अत्यंत अटीतटीची आणि खर्‍या अर्थाने 'घासून' झाली. मतमोजणीच्या अगदी सातव्या फेरीपर्यंत विखे यांची (157665 विरुद्ध 148036) आघाडी टिकून होती. मात्र सातव्या फेरीतच लंके यांनी (181835 विरुद्ध 177796) विखेंच्या पुढे जाण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र लंके यांनी प्रत्येक फेरीत कमी प्रमाणात का होईना वाढ घेत आघाडी टिकवून ठेवली. शेवटच्या फेरीमध्ये नीलेश लंके यांनी 29306 चे मताधिक्य मिळविले. पोस्टल मतदानाची मोजणी सुरू असून, लंकेंचा सुमारे 30 हजारांच्या फरकाने विजय झाल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक फेरीत चुरस वाढत जाऊन अखेर लंके यांनी बाजी मारली. नगर आणि राहुरी वगळता बहुतेक सर्व तालुक्यांतून लंके यांना आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले.

शिर्डीत उबाठा सेनेचा विजय

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा 50529 मतांनी पराभव करत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभवाची धूळ चारली. भाऊसाहेब वाकचौरे यांना 476900 मते मिळाली, तर लोखंडे यांना 426371 मतांवर समाधान मानावे लागले. वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी 90929 मते घेत वाकचौरे यांच्या विजयाला हातभार लावला.

2014पूर्वी जनतेतील खासदार असा लौकिक निर्माण केलेल्या वाकचौरे यांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये लोखंडे यांच्याकडूनच पत्करावा लागला होता. त्यात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील पराभवही त्यांच्या वाट्याला आला होता. त्यांनी या वेळी मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे लोखंडे यांना आव्हान दिले. खरे तर लोखंडे ठाकरे सेनेचेच खासदार होते. मात्र शिवसेना फुटल्यानंतर लोखंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आणि शिर्डीत ठाकरे व शिंदे यांच्या गटांतच खरी लढत झाली. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची ठरली. मुख्यमंत्र्यांनी वारंवार शिर्डीत येऊन लोखंडेंसाठी जनतेला साकडे घातले मात्र त्यांना मतदारांनी नाकारले.
दोन वेळा ज्या शिवसैनिकांनी लोखंडे यांना विजयी केले, त्यांनीच या वेळी लोखंडे यांना नाकराल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT