अकोले; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर पथकाने अकोले तालुक्यातील अवैध देशी दारू विक्री करणार्या दुकानांवर छापे टाकले. याप्रकरणी 8 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. 17,500 रुपये किमतीच्या देशी दारूचा मुद्देमाल जप्त केल्याने संगमनेर दारू उत्पादन शुल्क विभागासह अकोले व राजूर पोलिस स्टेशनचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 श्रीरामपूरचे निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अकोले तालुक्यातील राजूर व इंदोरी फाटा येथे छापे मारून अवैध दारू विक्री करणार्यांविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी आनंद अंकुश देशमुख, विक्रम अशोक घाटकर ,दीपक बाळू पोलादे, अमोल सूर्यकांत कानकाटे, उजय शुक्ला, नवनाथ सुरेश देशमुख, सचिन सुदाम जाधव, भाऊसाहेब बाळाजी शिंदे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये हॉटेल हिरा, केळुगण शिवार, राजूर व हॉटेल सह्याद्री इंदोरी फाटा यांचा समावेश आहे. यावेळी हॉटेल सह्याद्रीचा मालक दशरथ अप्पा नवले यास पसार घोषित करण्यात आले. मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग विभागीय उपायुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क अ. नगरचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. 2 श्रीरामपूर निरीक्षक गोपाळ चांदेकर व दुय्यम निरीक्षक एस. जी. शिंदे यांनी केली. या कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक के. के. शेख,टी. आर. शेख व महिला एम. आर. फटांगरे यांचा सहभाग आहे. या कारवाईमुळे अकोले तालुक्यातील अवैध दारु पुन्हा चर्चेत आली आहे.