अहमदनगर

नगर : बेकायदा गुटखा विक्रीचा विळखा

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गुटखा राजरोसपणे विकला जात असताना, अन्न व औषध प्रशासनाकडून त्यावर काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे हा विभाग सध्या तरी जिल्ह्यात पांढरा हत्तीच झाल्याचे दिसत आहे. नेवासा तालुक्यात बेकायदा गुटखा विक्रीचा विळखा वाढला आहे. पोलिसांकडून केवळ कारवाईचा बडगा उभा केला जात असून, त्या माध्यामातून हप्तेखोरीच वाढली आहे. तालुक्यात गुटख्याच्या पाठोपाठ आता माव्यातूनही लाखोंची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे माव्यातून अनेकांना रोजगार निर्माण झाला असला तरी, बहुतांशी ठिकाणी बालकामगार दिसत आहे.

शासनाने गुटखा व मावा विक्रीवर बंदी लागू केली. मात्र, नेवासा तालुक्यात या बंदीच्या निर्णयाला काहीच फरक पडलेला दिसत नाही. तालुक्यात सध्याला रस्त्यालगत मुख्य शहराच्या चौकात व प्रमुख रस्त्यावर व गावागावातील किराणा दुकानावर, तसेच नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, कुकाणा, घोडेगाव या मार्गावरील पानटपर्‍यांवर बिनधास्तपणे गुटखा विकला जातो. मावा मळताना बालमजूर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.

याकडे प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पानटपरी चालक छुप्या पद्धतीने मनमानी दर लावून गुटखा व मावा विक्री करतात. गुटखा बंदी असल्याने अचानक माव्याला मोठी मागणी वाढली. मात्र, 2013 मध्ये माव्यावरही बंदी आणली गेली. सुरुवातीच्या काळात छुप्या पद्धतीने विक्री सुरू राहिली. मात्र, या बंदीचा काहीच परिणाम झाला नाही. ही बंदी फक्त कागदवरच राहिली. यामुळे मुजोर झालेल्या या गुटखा व मावा विक्री दुकानदारांनी आता खुलेआम गुटखा विक्री सुरू केली आहे. कारवाईच्या नावाने बोंबाबोंब झालेली आहे.

मावा किंवा गुटखा हा शरीराला घातकच आहे. यात भर म्हणून या माव्यात वापरल्या जाणार्‍या पदार्थांची भेसळ शरीराला अतिघातक ठरत आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचा चुना वापरला जातो. यामुळे तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मावा खाणार्‍यांना जेवणासाठी तिखट भाजी खाताना त्रास होणे, तोंड स्वच्छ करण्यासाठी तसेच जिभेला व गालाला जखमा झाल्याचे अनेकजण बोलून दाखवित आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी हे अवैध गुटखा विक्री करणार्‍यांच्या पाठीशी असतील तर राज्यात गुटखा बंद फक्त कागदावरच राहणार आहे. गुटखा विक्रीकडे डोळेझाक होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

पहाटे गुटख्याची वाहतूक
नेवाशात पहाटेच्या वेळी मोटारसायकल किंवा अन्य वाहनाने पंटरच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक केली जाते. गुटखा विक्रेत्यांची मनमानी वाढल्याने सामान्य माणूस उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नाही. गुटखा विक्रीचा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

तरुणपिढी गुटख्याच्या आहारी
नेवासा तालुक्यात गुटखा खुलेआमपणे विक्री होत असून, तरुणपिढी त्याच्या आहारी जात असल्याने त्यांच्यात आजाराचे प्रमाणात वाढले आहे. गुटखा विक्रीमुळे होणार्‍या मोठ्या घटनेची प्रशासन वाट पाहतेय काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

SCROLL FOR NEXT