अहमदनगर

जवळ्यात वृक्षांची बेकायदा कत्तल; जेसीबी यंत्राच्या साहाय्याने पाडले जातात वृक्ष

अमृता चौगुले

जवळा; पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कुकडी कालवा भागात वृक्षांची बेकायदेशीरपणे दिवसा ढवळ्या कत्तल चालू आहे. एकीकडे वनसंवर्धनाचे धडे कागदी घोडे नाचविणारे वनखाते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. जवळा परिसरात आंबा, चिंच यासारख्या फळ वृक्षांची बेकायदेशीरपणे कत्तल करून विकली जात आहेत.

दिवसाढवळ्या तोड केलेल्या लाकडांच्या वाहतुकीकडेही प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे कुठेतरी मिलीभगत असल्याने व त्यांच्या आशीर्वादाने हा लाकूडतोडीचा गोरखधंदा सध्या कालवा परिसरात जोरात चालू असल्याचे दिसून येत आहे. सुमारे पन्नास ते साठ वर्षांचे पूर्ण वाढ झालेले जुने वृक्ष काही तासात यंत्रांच्या साहाय्यानेे भुईसपाट केले जात असून, त्याची जागेवरच खांडोळी करून गाड्या भरून वाहतूक केली जात आहे.

हा सर्व प्रकार लाकूड तस्कर व संबंधित अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे सर्वकाही आलबेल चालू असल्याचे बोलले जात आहे. वन खात्याने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचे नुसते धडे न देता, जवळा परिसरात चालू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीवर वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

SCROLL FOR NEXT