अहमदनगर

श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंदे जोरात; पोलिसांच्या जुजबी कारवाया ठरतायेत निष्प्रभ

अमृता चौगुले

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात दारू, मटका, गुटखा, गांजा तस्करी जोरात सुरू असून, श्रीगोंदा व बेलवंडी पोलिसांच्या जुजबी कारवाया निष्प्रभ ठरत आहेत. पोलिस यंत्रणेची निष्क्रियता अवैध धंदे करणार्‍यांचा पथ्यावर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. नव्याने हजर झालेल्या पोलिस अधीक्षकांनी या अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी आणि श्रीगोंदा अशी दोन पोलिस ठाणी आहेत. बेलवंडी पोलिस ठाण्यात रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांचा या परिसरचा अजून अभ्यास सुरू असला, तरी यापूर्वी या ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या अधिकार्‍यांनी विशेष कामगिरी केलेली नाही. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या चोर्‍यांचा अद्याप तपास लागलेला नाही.

अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे दिसले नाही. इतर कामगिरीपेक्षा पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांमधील अंतर्गत धुसफूसच जास्त चर्चेचा विषय राहिली. बेलवंडी परिसरात अवैध धंदे सुप्तावस्थेत सुरू असतात. विशेष करून गावठी दारू उत्पानाचा मोठा उद्योग घोड नदीपट्यातील परिसरात सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत या परिसरात कारवाई झाल्याचे दिसत नाही. गुटखा, गांजाची तस्करी सुरू असते, त्यावर पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.

श्रीगोंदा शहरात तर मटका व्यवसाय राजरोस सुरू आहे. मटका व्यावसायिकांचा पोलिस ठाणे परिसरात असणारा वावर चर्चेचा बनला आहे. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात सुरू असणार्‍या मटका व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने मटका चालविणारे पोलिसांची आपल्यावर कृपाराहावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. म्हणूनच की राजरोस सुरू असणार्‍या मटक्या व्यवसायाविरोधात ठोस कारवाई करण्यात पोलिस यंत्रणेचे हात धजावत नाहीत.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर जिल्ह्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले; मात्र त्यानंतर कारवाई का झाली नाही. एक कारवाई करून श्रीगोंदा पोलिसांनी औपचारिकता पूर्ण केली का? असाही प्रश्न निर्माण होतो.अवैध धंद्या विरोधात सातत्याने कारवाई का होत नाही. हे एक गूढच म्हणावे लागेल.

कागदोपत्री गुटखा पूर्णतः बंद
कागदोपत्री गुटखा पूर्णतः बंद आहे. मात्र, श्रीगोंद्यात गल्लोगल्ली मिळणारा हर एक प्रकारचा गुटखा पोलिस यंत्रणेची निष्क्रियता अधोरेखित करतो. गुटख्याविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी किती कारवाया केल्या? असा सवाल श्रीगोंदेकर विचारू लागले आहेत. गावठी दारूबाबतीत हीच अवस्था आहे.

कारवाईची मागणी
अवैध धंद्यामुळे मुबलक पैसा मिळत असल्यामुळे गुन्हेगारी वाढू लागली आहे. किंबहूना अवैध धंदेच गुन्हेगारीचे मूळ असल्याने पोलिसांना या विरोधात उद्याचा धोका ओळखून कारवाईसाठी पावले उचलावी लागणार आहेत. या अवैध धंद्यांविरोधात श्रीगोंदा व बेलवंडी पोलिस कारवाई करत नसल्याने आता पोलिस अधीक्षकांनीच कारवाईसाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT