अहमदनगर

जर झेडपीत आग लागली तर…? व्हॉल्व गायब, पाईपलाईन नादुरुस्त, मॉकड्रिलचाही विसर

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरच्या सिव्हील रुग्णालयातील जळीताची घटना अजुनही ताजी आहे. सहकार विभागाला आग लागून कागदपत्रे जळाल्याचे सर्वश्रूत आहे. त्यात बीड झेडपीतील पाणी पुरवठा विभागात आग लागून त्यात कागदपत्रे भस्मसात झाले आहेत. त्यामुळे नगर झेडपीची अग्नीसुरक्षा यंत्रणाही आता चर्चेत आली आहे. प्रत्यक्षात येथील अग्निशमन यंत्रणा बर्‍यापैकी नादुरुस्त आहे. अलार्म सुविधा ठप्प आहे. पाणी आहे मात्र अत्याधुनिक हॉल्व, पाईपलाईन बंद आहे. कोणत्याही प्रकारचे प्रात्याक्षिक (मॉकड्रिल) केले जात नाही. चार वर्षांपासून फायर ऑडीटसाठी निधी नाही, आपत्कालिन मार्गही मृत्यूला निमंत्रण देणारा आहे. या सर्व गंभीर प्रकाराकडेे सीईओ आशिष येरेकर हे कधी लक्ष देणार, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

जिल्हा परिषदेची नूतन इमारत ही 2004 मध्ये पूर्णत्वास गेली.साधारणतः 2006 मध्ये या इमारतीत प्रशासकीय कामकाज सुरू झाले. या ठिकाणी अर्थसह बांधकाम, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ग्रामपंचायत, पाणी पुरवठा ई. विभाग आहेत. या चार मजल्यांवर प्रत्येक ठिकाणी फायर फायटींग यंत्र आहे. मात्र प्रत्यक्षात आग लागलीच, तर ही यंत्रणा किती सक्रीय आहे, याची चाचपणी करण्याची गरज आहे.
जिल्हा रुग्णालयातील घटनेनंतर सिव्हिलच्या कर्मचार्‍यांना नुकतेच आपत्तकालिन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या धर्तीवर जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांनाही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त होत आहे. अग्नीशमन यंत्रणेचे अद्यावतीकरण करून त्याच्या नियंत्रणासाठी सेवानिवृत्त किंवा अनुभवी कर्मचार्‍यांची नेमणूक होणे अपेक्षित आहे. लिफ्टबाबतही आपत्कालिन यंत्रणा उभी करण्याची मागणी आहे. तसेच आपत्कालिन मार्गाबाबतही लक्ष द्यावे लागणार आहे.

फायर ऑडिट नाही

फायर फायटींग यंत्रणेचे दरवर्षी नाही, मात्र किमान ठराविक कालावधीनंतर तरी यंत्रणेमार्फत ऑडिट करण्याची गरज आहे. सहा महिन्यांपूर्वी ऑडिट संदर्भात विद्यूत विभागातून पाठपुरावाही झाला. मात्र त्याचे पुढे काय झाले, हे समजू शकले नाही. आपत्कालिन परिस्थितीत आग विझविण्यासाठी अ‍ॅटोमॅटीक सिस्टीम उभारण्यात आली होती.यामध्ये झेडपीच्या मागील व अन्य काही ठिकाणी फायर बॉक्स बसविण्यात आलेले आहे. यात व्हॉल्व सिस्टीम आहे. तो व्हॉल्व फिरवला ही त्याव्दारे पाणी येवून फवारणीने आग विझवणे शक्य आहे. मात्र आज अनेक बॉक्सच रिकामे आहे. त्यातील पाईप, व्हॉल्व गायब असून, त्यात अक्षरशः रिकाम्या बाटल्या निदर्शनास येत आहे.

तीन विद्युत पंप; दुरुस्तीला किती?

जिल्हा परिषदेने फायर फायटींगसह दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी पाणी सुविधा आणि त्याठिकावी विद्युत पंप बसविले आहेत. अशाप्रकारे 50 एचपीचे दोन पंप आहेत, तर 15 एच.पी.चा एक पंप आहे. झेडपी प्रवेशव्दारासमोर 1 लाख लिटर साठवण क्षमतेची भूमिगत पाणीटाकी बसविण्यात आलेली आहे. मात्र आता पंपाची देखभाल गरजेची असून, त्यासाठीही विशेष तरतूद करावी लागणार आहे. मॉकड्रिलचा प्रशासनाला विसर

सन 2018 पर्यंत दरमहिन्याला यंत्रणेची चाचपणी केली जायची. मनपाच्या मदतीने मॉपड्रिलही घेतले जायचे. मात्र त्यानंतर ही यंत्रणाच विस्कळीत झाल्याने चार वर्षांपासून एकही मॉपड्रिल घेण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद यंत्रणा आप्तकालिन परिस्थितीबाबत किती गंभीर आहे, हे पहायला मिळते.

सुमारे 90 रिडेक्टर चोरीला?

एखाद्या खोलीत कॉर्बनडायऑक्साईड वाढला, किंवा धूर आला तरी लगेच रिडेक्टरव्दारे सायरन वाजून त्यातून यंत्रणा अलर्ट होते. साधारणतः प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक रिडेक्टर बसविण्यात आलेले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी इमारतीतून 90 पेक्षा अधिक रिडेक्टर रहस्यमयरित्या गायब झाले होते. त्यानंतर तत्कालिन पदाधिकारी व प्रशासनाने त्या ठिकाणी नवीन रिडेक्टर बसविल्याची चर्चा आहे. मात्र ते किती सक्रिय आहेत, याची अद्याप चाचणीच झालेली नाही. कर्मचारी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्षता!

जिल्हा परिषदेत सर्वच विभागात सुमारे 500 कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकाणी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी शेकडो नागरिकही येत असतात. अशावेळी कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर फायटीगंच्या ऑडीट आणि त्रुटींबाबत आढावा घेण्यासाठी विद्यूत व बांधकाम विभाग आता तरी दक्षता घेईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT