राहुरी : पुढारी वृत्तसेवा
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुलसचिव पदाचा वादंग चांगलाच पेटला असताना विद्यापीठ प्रशासनाकडून झालेल्या खुलाशामध्ये सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकुंद शिंदे यांनी 'मीच एकमेव विद्यापीठाचा कुलसचिव' असल्याचा खुलासा केला आहे.
दरम्यान, कार्यमुक्तीच्या ९ दिवसानंतर अपर आयुक्त म्हणून अरुण आनंदकर हे नाशिक महसूल विभागात रुजू झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या खुलाशानंतरही अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.
विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वादंगाची मालिका सुरूच आहे. अपहार, भ्रष्टाचार, अनागोंदी, मनमानी कारभार तसेच अनेक चुकीचे निर्णय घेतल्याबाबत अनेक सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांकडून शेकडो तक्रारी दाखल असून त्याबाबत कारवाईची प्रतीक्षा असतानाच ८ ऑक्टोबर रोजी अचानक ६ महिन्यांपूर्वीच कुलसचिव पदावर विराजमान झालेले महसूल विभागाचे अपर जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांना कार्यमुक्त करण्यात आले व त्यांच्या जागी डॉ. शिंदे यांची नियुक्ती झाली.
याबाबत आरोप-प्रत्यारोपाबाबत शिंदे यांनी विद्यापीठ प्रशासनामार्फत धक्कादायक खुलासा करीत आनंदकर यांच्यावर आरोप केले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी आनंदकर हे कार्यालयीन वेळेपूर्वीच घरी गेले. त्यांनी शिपायाच्या हाती पाठविलेले कार्यमुक्तीचे पत्र तसेच हस्तांतरण दस्त स्वीकारले नाही. त्यांनी आदेश न स्वीकारल्याने विद्यापीठ प्रशासनाने त्यांना ई-मेल तसेच पोस्टाने पत्र पाठविले.
कुलगुरू पाटील यांच्या आदेशाचे वेळोवेळी उल्लंघन करणारे कुलसचिव आनंदकर यांनी शासन आदेशाचे पालन केले नाही. कुलगुरू हे शासननियुक्त तसेच अनुशासनात्मक पद असतानाही कुलसचिव आनंदकर यांनी अनेकदा कुलगुरूंच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अशोभनीय कृत्य योग्य नसल्याचे कुलसचिव शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नगर जिल्ह्यातील रहिवासी असल्यानेच आनंदकर यांना परजिल्ह्यात नियुक्तीसाठी कार्यमुक्तीचा आदेश आला असावा असा अंदाज कुलसचिव डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
आनंदकर शासनाच्या आदेशानुसार मी बुधवारी नाशिक महसूल विभागात अपर आयुक्त म्हणून रुजू झालो. ९ दिवसांनी खुलाशाची जाग आल्यानंतर अत्यंत विद्वान व ज्ञानी मंडळींनी माझ्या बदलीच्या कारणासह पश्चातबुद्धीने केलेल्या खुलाशावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे मत अरुण आनंदकर यांनी व्यक्त केले.