अहमदनगर

नगर-मनमाड रस्ता आणखी किती बळी घेणार? प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेतच

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : नगर- मनमाड हा महामार्ग यावरुन प्रवास करणार्‍या निरपराध प्रवाशांच्या जिवाचा कर्दनकाळ ठरला आहे. या रस्त्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेकडो व्यक्तींचे कुटुंब उघड्यावर पडली आहेत. गेल्या आठवड्यात या मार्गावर पाच जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. परंतु याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. आठवड्यात घडलेल्या पाचव्या अपघाताच्या घटनेत 28 वर्षीय आबासाहेब बापुसाहेब ससाणे (रा. बाभूळगाव ता. राहुरी) यांचा जागीच मृत्यू झाला.

राहुरी हद्दीतील नगर मनमाड रस्त्यावरील सूतगिरणी हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंपासमोर 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता हा अपघात झाला. डबल ट्रॉली लावत ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर व अज्ञात वाहनाच्या घडकेमध्ये दुचाकीस्वार ससाणे हे जागीच ठार झाले. त्यांच्यासमवेत असलेल्या पत्नी अंजली ससाणे या गंभीर जखमी झाल्या. सासू मिराबाई वायदंडे, भाचा कार्तिक वायदंडे (रा. चांदेगाव ता. राहुरी) यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघातग्रस्तांना तातडीने लगतच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मयत ससाणे हे दुचाकीवर पुणतांबा येथे सासू, पत्नी व भाच्यासह देवदर्शनाला जात होते. टॅ्रक्टर व त्यासह असलेल्या दोन ट्रॉलीचा कट बसल्यानंतर ते अज्ञात वाहनाला धडकले. अपघात घडताच परिसरातील नागरीकांसह प्रवाशांनी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला शिवबा प्रतिष्ठाण रुग्णवाहिकेचे चालक रवी ढोकणे, देवळाली प्रवरा रुग्णवाहिकेचे रवी देवगिरे यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यास मदत केली. घटनेनंतर परिसरातील नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गत आठवड्याभरात सूतगिरणी हद्दीतील हा पाचवा अपघात आहे. यामध्ये तीन मोठे अपघात झाल्याने त्यामध्ये तिघांचा बळी गेल्यानंतर आबासाहेब ससाणे यांचा चौथा बळी गेला आहे. अपघाताबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नगर- मनमाड रस्त्याची डागडूगी करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी वितरीत केल्याचा कांगावा करण्यात आला. रस्त्यामध्ये खड्डे की खड्यात रस्ते अशा अवस्थेत गेलेल्या नगर- मनमाड रस्त्याने शेकडो जणांचा बळी घेतला आहे. सूतगिरणी हद्दीत एका बाजुचा रस्ता खोदून ठेवलेला असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी याच हद्दीत अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. अपघाताच्या घटना नित्यानेच घडत असताना अनेक निष्पाप जीवांच्या रक्तांचा सडा वाहत आहे. परंतु गेंड्याच्या कातडे पांघरलेल्या बांधकाम विभाग व जागतिक बँक प्रकल्प विभागाला जनतेचे अश्रू दिसेनासे झाले आहे.

चला दहावा घालू प्रशासनाचा

अनेक आंदोलने, निवेदने, मोर्चा व रास्ता रोको करूनही प्रशासनाची बघ्याची भूमिका पाहता नगर- मनमाड रस्ता कृती समितीचा संताप अनावर झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ रस्ता अपघातामध्ये मृत झालेल्या नागरीकांच्या स्मरणार्थ शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता नगर मनमाड रस्त्यावरील अपघातस्थळ बनलेल्या सूतगिरणी हद्दीत दशक्रिया विधी घातला जाणार असल्याची माहिती रस्ता कृती समितीने दिली आहे. या आंदोलनासाठी राहुरी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT