अहमदनगर

सव्वा लाख विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातून यावर्षी इयत्ता 12 वी आणि 10 वीचे सुमारे 1 लाख 32 हजार विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांपुर्वीच पुणे विभागाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी नगरमध्ये शिक्षणाधिकारी, केंद्र संचालक, परिरक्षक यांच्यासमवेत बैठक घेवून याबाबतचा आढावा घेतला. यावेळी परीक्षार्थींना उत्साही, भितीमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी केंद्राची रचना, भौतिक सुविधा याबाबत सूचना करण्यात आल्याचे समजले. इयत्ता 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर, 10 वीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. दोन्ही परीक्षेसाठी सुमारे 1 लाख 32 हजार परीक्षार्थी आहेत. 291 परीक्षा केंद्र आणि प्रत्येक केंद्रावर एक असे 291 केंद्र संचालक आहेत. दोन्ही परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर 'वॉच' ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी 1, असे 14 तर नगर शहरात तीन, संगमनेरात तीन आणि नेवाशात एक असे एकूण 21 परिरक्षक आहे. यावर्षी 12 वीचे तीन परीक्षा केंद्र वाढले आहेत. तर 10 वीचे 2 केंद्र वाढल्याचे समजते. दरम्यान, परीक्षार्थींच्या व्यवस्थेबाबत गुरुवारी शहरातील एका विद्यालयात शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केंद्र संचालक, परिरक्षक यांची बैठक घेतली. यात बोर्डाच्या वतीने सचिव औदुंबर उकिरडे यांनी स्वतः उपस्थित राहुन मार्गदर्शन केले .

भरारी पथके, पोलिस बंदोबस्तही असणार!
गेल्यावर्षी प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षा घेतल्या. यंदाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचा प्रयत्न आहे. लवकरच जिल्हाधिकारी स्वतः याबाबत बैठक घेवून भरारी पथके, पोलिस बंदोबस्त इत्यादी गोष्टीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

SCROLL FOR NEXT