अहमदनगर

नगर : गुटखा प्रकरण : हुच्चे अन् शर्माचा फोन बंद !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : गुटखा प्रकरणातील आरोपी गणेश हुच्चे आणि त्याचा साथीदार राहुल शर्मा दोघेही मोबाईल बंद करून फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन्ही आरोपींच्या मागावर असून पोलिसांनी खबर्‍यांचे नेटवर्कही ऑन केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.  शहरातील दिल्लीगेट भागातून आयजींच्या पथकाने सुमारे साडेनऊ लाखांचा गुटखा जप्त केल्यानंतर स्थानिक पोलिस खळबळून जागे झाले आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा आणल्या जात असताना स्थानिक पोलिसांकडून कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, न्यायालयाने हरिश खेमकरण खंडोजा (रा.प्रवरानगर, ता. राहता), दीपक पोपट यादव (रा. ब्राह्मणगल्ली, माळीवाडा), प्रफुल्ल शेटे (रा.सावेडी) या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर गणेश हुच्चे व राहुल शर्मा हे दोघे फरार आहेत. या दोघांना अटक झाल्यास इतरही बडी नावे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात आयजींच्या आदेशाने कोतवाली पोलिसांकडे असलेला तपास एलसीबीकडे देण्यात आल्यानेही अनेक उलटसुलट चर्चांना निमित्त मिळाले आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर या प्रकरणावर लक्ष ठेऊन असल्याने आता एलसीबी फरार दोन आरोपींना कधीपर्यंत अटक करणार, याकडे नजरा लागून आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे पुढील तपास करीत आहेत.

तीन आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गणेश हुच्चे व राहुल शर्मा या दोन आरोपींचा शोध सुरू असून लवकरच अटक केली जाईल.
                                          – सोपान गोरे, पोलिस उपनिरीक्षक, एलसीबी

SCROLL FOR NEXT