नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संवर्ग एक मधील सर्वसाधारण बदल्या अंतर्गत दाखल प्रस्तावांची पडताळणी करावी, अशी मागणी सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना करण्यात आली आहे. जि.प. शिक्षक संवर्गाच्या बदल्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुधारीत धोरण लागू केलेले आहे. त्यानुसार 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णयदेखील पारीत केलेला आहे. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेत विशेष संवर्ग एकमध्ये शासन निर्णयानुसार जे शिक्षक गणले जातात, अशा शिक्षकांनी बदलीसाठी सक्षम पुरावे, कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडणे अनिर्वाय असते.
बीड जिल्हा परिषदेमध्ये सदर संवर्गासाठी प्राप्त प्रस्तावांपैकी अनेकांची प्रमाणपत्र हे नगर जिल्ह्यातून मिळाल्याचे समजत आहे.
सन 2012 -13 मध्ये जिल्हा परिषद नगर येथून बदलीसाठी अनेक शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. त्याबाबत चौकशी होऊन तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जवळपास 74 बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारकांवर फौजदारी कारवाई केली होती. या प्रकरणात प्रमाणपत्र मिळवून देण्यात दलालांचाही सहभाग पुढे आला होता.
त्यामुळे आपल्याकडे संवर्ग एकमध्ये बदलीसाठी प्राप्त प्रस्तावासोबत जोडलेले पुरावे खरे आहेत किंवा खोटे याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत पडताळणी करूनच बदली प्रक्रिया करावी, अशी मागणी सावली संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी केली आहे. दरम्यान, संवर्ग एकमध्ये जे खरोखर दिव्यांग आहेत, दुर्धर आजाराने व्याधीग्रस्त आहेत, किंवा अन्य प्रकाराने ते बदली प्रक्रियेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी या पडताळणीला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र ज्यांच्या व्याधी आहेत, त्याची पडताळणी होणेकामी प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घ्यावी, असाही सूर सामाजिक संघटनांचा येत आहे.
नाशिकला जमतं; मग नगरला का नाही?
सन 2016 ते 2019 दरम्यान ज्या कर्मचारी व शिक्षक यांनी बदली करण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहे. अशा शिक्षक कर्मचारी यांची पुन्हा नव्याने शारीरिक तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करणे व नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग प्रवर्गातून भरती झालेल्या व्यक्तींना केंद्रीय प्रणालीचे दिव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड (यु.आर.डी. कार्ड) सक्तीचे करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा परिषदेने घेतला आहे. मात्र नगर जिल्हा परिषदेचे सीईओ येरेकर हे धाडस का करत नाही, याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.