अहमदनगर

अहमदनगर : ‘गुरुजी मल्टिस्पेशालिटी’च्या निधीचा मार्ग खडतर!

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा तीन दिवसांवर आली असताना वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शिक्षकांच्या विकास मंडळाच्या जागेत गुरुजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी सभासदांच्या कायम ठेवींमधून प्रत्येकी 20 हजार रुपये वळविण्याच्या ठरावाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी गटांनी कंबर कसली आहे. याविरोधात विरोधी गटांची समन्वय समिती शुक्रवारी (दि. 18) जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांना निवेदन देणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक बँकेची सभा वादळी होण्याची 'परंपरा' रविवारीही (दि. 20) कायम राहील, अशी शक्यता आहे.

बर्‍याच कालावधीनंतर शिक्षक बँक आणि विकास मंडळात सध्या एकाच गटाची सत्ता आहे. त्यातच विकास मंडळाच्या जागेत 'गुरुजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल' उभारण्याचा शिक्षक बँकेच्या सत्ताधार्‍यांचा मानस आहे. त्यासाठी निधी म्हणून सभासदांच्या ठेवींमधून प्रत्येकी 20 हजार रुपये वळविण्याचा विषय 20 ऑगस्टच्या सभेत चर्चेला येणार आहे. मात्र या ठरावास सभेपूर्वीच तीव्र विरोध सुरू झाला आहे.
शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सर्व विरोधी गटांच्या समन्वय समितीतर्फे शुक्रवारी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देण्यात येणार आहे.

सभेमध्ये करावयाच्या विरोधाची चुणूक या वेळी निदर्शनास येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डॉ. कळमकर, गुरुकुलचे डॉ. संजय धामणे, रोहकले गटाचे प्रवीण ठुबे, 'इब्टा'चे एकनाथ व्यवहारे, एकल मंडळाचे सुभाष तांबे, गोरक्षनाथ नरवडे, सदिच्छा मंडळाचे रवींद्र पिंपळे आदींनी एकत्र येऊन समन्वय समितीची स्थापना केली आहे. ही समिती सभासदांचे पैसे वळविण्याच्या 'त्या' ठरावाला विरोध करणार आहे. या समितीची नुकतीच बैठक झाली.

'विकास मंडळाच्या जागेतील बांधकामाला आपला विरोध नाही. स्वेच्छेने ज्यांना काही रक्कम द्यायची असेल ते देतील. मात्र कायम ठेवीतून विकास मंडळाकडे 20 हजार रुपये परस्पर वळविण्याच्या निर्णयाला आपला विरोध राहील,' असे या बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार समन्वय समिती उपनिबंधकांना शुक्रवारी निवेदन देणार आहे. दरम्यान, सभेपूर्वी सत्ताधार्‍यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्याने शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 'सालाबादप्रमाणे' वादळी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात सत्ताधार्‍यांच्या भूमिकेकडेही शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

कपातीला माझा विरोध…

'कायम ठेवीतून माझी रक्कम कपात न करणेबाबत…' अशा आशयाचे पत्र बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या नावे काही सभासद देत आहेत. या पत्रात म्हटले आहे, 'सभासदांची 20 हजारांची रक्कम कायम ठेवीतून विकास मंडळाकडे वर्ग केली जाणार आहे; परंतु अशा कपातीला माझा विरोध आहे. माझ्या लेखी परवानगीशिवाय माझ्या कायम ठेवीतून एक रुपयासुद्धा इतरत्र कुठेही वर्ग करण्यात येऊ नये. मी प्रतिनिधीमार्फत माझा अर्ज आपलेकडे सादर करत आहे.'

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT