अहमदनगर

नगर : माळढोक क्षेत्रात खडी क्रशर सुरूच

अमृता चौगुले

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील सुपे येथील निखिल कन्स्ट्रक्शनला तहसीलदारांनी नोटीस बजावून खडी क्रशर बंद करण्यास कळविले होते. मात्र, त्यांनी महसूल प्रशासनाच्या नोटिशीला केराची टोपली दाखवून खडी क्रशर सुरू ठेवले आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानपरिषदेमध्ये कर्जत तालुक्यातील अनधिकृत खडी क्रशर चालू असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. या संदर्भात जबाबदारी निश्चित करून प्रांताधिकारी व तहसीलदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

या अधिकार्‍यांच्या निलंबनापूर्वीच तालुक्यातील जवळपास 17 खडी क्रशरचालकांना तहसीलदारांनी नोटिसा देऊन क्रशर बंद ठेवण्याबाबत कळविले होते. आज तालुक्यातील सर्व माळढोक प्रवण क्षेत्रातील खडी क्रशर पूर्ण बंद आहेत. असे असताना तालुक्यातील सुपे येथील एका क्रशरला तहसीलदारांनी 24 डिसेंबर रोजी नोटीस काढून खडी क्रशर बंद करण्याबाबत कळविले होते. मात्र, त्यांनी महसूल प्रशासनाच्या नोटिशीला केराची टोपली दाखवून खडी क्रश सुरू ठेवले आहे.

या खडी क्रशरला दिलेल्या नोटिशीत म्हटलेे की, केंद्रीय पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या माळढोक पक्षी अभयारण्य अध्यादेशानुसार खडी क्रशर संवेदनशील क्षेत्र यामध्ये येत आहे. यामुळे आपल्या परिसरात संवेदनशील क्षेत्राच्या तरतुदी लागू होत आहेत. हा खडी क्रशर गट क्रमांक 100, तर माळढोक पक्षी अभयारण्यातील क्षेत्रातील गट नंबर 75 मध्ये येत आहे. ते तत्काळ बंद करून खडी क्रशरची यंत्रसामग्री काढून घेण्यात यावी, अशी नोटीस दिली होती.

खडी क्रशरला आशीर्वाद कोणाचे?

तालुक्यातील सर्व खडी क्रशर बंद असताना सुपे येथील निखिल कन्स्ट्रक्शनचे खडी क्रशर माळढोक प्रवण क्षेत्रात कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. अधिकारी कोणतीच कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या कंपनीने क्रशर सुरू करताना सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. तसेच महसूलची नोटीस आली असताना क्रशर सुरू ठेवले आहे.

SCROLL FOR NEXT