अहमदनगर

सरकारने घोषणेऐवजी शेतकर्‍यांना मदत करावी : आ. थोरात

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने फक्त घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रत्यक्ष मदत करा, असा सल्ला माजी कृषी आणि महसूलमंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी सरकारला दिला. संगमनेर तालुक्यातील सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बु.पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी या गावांतील गारपीट तसेच अवकाळी पावसाने गारपीट आणि अवकाळी पावसाने या विविध गावांमध्ये टोमॅटो, डाळिंब घास, मका, गवत चारा यासह डाळिंब शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी केली असून प्रशासनाला तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त मदतीच्या सूचना केल्या आहे.

आ. थोरात म्हणाले की, शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला असून वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले बाजार भाव अशा मोठ्या अडचणीतूनही मोठी गुंतवणूक करत शेतकरी शेती फुलवतो. मात्र अवकाळी पाऊस गारपीट यामुळे उभी केलेली पिके जमीनदोस्त झली आहे. अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा संकटाच्या काळात सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आ. थोरात यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, संतोष हासे, सोमनाथ गोडसे, विलास कवडे, बाळासाहेब कानवडे, मारुती कवडे, संदीप गोपाळे, बाळकृष्ण गांडाळ, शिवाजी वलवे, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविधविभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकर्‍यांना मदतीची घोषणा जाहीर करावी
राम हे सर्वांचे श्रद्धास्थान असून ते माझ्या शेतकरी बांधवांमध्ये आहे. शेतकरी संकटात असताना देव आयोध्येत कसा कसा राहील, ते सुद्धा या संकट काळात शेतकर्‍यांमध्ये असेल? असा सवाल उपस्थित करून सरकारने वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव यावरून लक्ष वळविण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करण्याऐवजी प्रत्यक्ष शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल, याबाबतची घोषणा उद्या होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करावी, अशी मागणी ही काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT