अहमदनगर

नगर झेडपीचा राज्यात डंका ! 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्हा परिषदेची सर्वच विभागात सुरू असलेली घोडदौड राज्यासमोर आदर्शवत ठरणारी आहे. सीईओ आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात जलजीवनमध्ये नगरची टॉपच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, आता राष्ट्रीय आरोग्य अभियानात नगरच्या 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले जात आहे.  महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात झाली.

नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कारांची संकल्पना पुढे आली.
शासनाकडून सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कायाकल्प पुरस्कार योजनेअंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांच्या आधारावर पुरस्कृत करण्यात येते. यामध्ये निर्धारीत मानक पूर्ण करणार्‍या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात.

मूल्यांकनातून झाली निवड

नगर जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मूल्यांकन हे राज्यस्तरावरून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार व राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राद्वारे तयार चेकलिस्टप्रमाणे करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे.

राज्यात 463 पुरस्कार जाहीर

राज्यातील 463 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील सर्वाधिक 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांना हा पुरस्कार मिळाला आहे.

एक लाखापर्यंत बक्षीस

अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राम्हणवाडा व नगर तालुक्यातील चास यांनी संयुक्तपणे जिल्हांतर्गत प्रथम पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच 44 प्राथमिक आरोग्य केंद्रांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनाही प्रत्येकश्री 50 हजार रुपये मिळणार आहेत.

आरोग्य संस्थांचे बळकटीकरण

प्रा. आ. केंद्रांना वितरीत करण्यात आलेल्या रकमेतील 75 टक्के रक्कम आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी व 25टक्के रक्कम अधिकारी व कर्मचा-यांसाठी संस्था अंतर्गत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीचा विनियोग मार्गदर्शकप्रमाणे करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी जिल्हातरीय अधिकारी व पुरस्कार प्राप्त सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच संबंधित संस्थांना जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरीत होणार आहे.

36 आरोग्य केंद्रांना संधी

सन 2022-23 या वर्षासाठी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत प्रती तालुका 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे. अशी माहिती सीईओ आशिष येरेकर यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त आरोग्य केंद्र

नगर : चास, रुईछत्तीसी, वाळकी, टाकळी काझी, टाकळी खातगाव, मेहकरी
पारनेर : कान्हूर पठार, खडकवाडी, निघोज, रुई छत्रपती, अळकुटी, पळवे
राहुरी : उंबरे, टाकळीमिया, गुहा, मांजरी
संगमनेर : बोटा, चंदनापुरी, धांदरफळ, निमगाव जाळी
श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ, आढळगाव, बेलवंडी, कोळगाव
श्रीरामपूर : बेलापुर खु., माळवडगाव, टाकळीभान, निमगाव खैरी
अकोले : ब्राम्हणवाडा, विठा, म्हाळादेवी
नेवासा : उस्थळ दुमाला, चांदा, नेवासा बु.
पाथर्डी : खरवंडी कासार, तिसगाव, माणिकदौडी
राहाता : कोल्हार बु., दाढ बु., सावळी विहीर कर्जत कुळधरण, बारडगाव सुद्रिक
शेवगाव : हातगाव नगर, दहिगावने
जामखेड : अरणगाव
कोपरगाव : दहिगाव बोलका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT