नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रासह दक्षिण काशी संबोधल्या जाणार्या पुणतांबा परिसरात परतीच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने गोदावरीला पुन्हा तिसर्यांदा पूर आला आहे. दुथडी भरलेल्या नदीकाठावरील पिकांसह काही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
शनिवारी धरण पाणलोट क्षेत्रासह पुणतांबा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. यामुळे गोदामाईला यंदा तिसर्यांदा पूर आला आहे. वसंत बंधार्यात पाणी अडविल्याने प्रवाह मागे गेल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिर्डीसह कोपरगाव रस्त्यावरील पुलांवर पाणी आल्याने रविवारी या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
गोदावरीसह पावसाचे पाणी नदी काठ व इतरत्र शेतात साठल्यामुळे सोयाबीन व कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही प्रमाणात सोयाबीन काढणी शिल्लक असल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात चार-पाच वेळा परतीच्या पावसाने पुणतांबा परिसरात जोरदार हजेरी लावली. येत्या आठवड्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ऑक्टोबर हिटमुळे सकाळी उन्हाचा चटका नंतर पावसाची दमदार हजेरी असा अनुभव पुणतांबेकर सध्या घेत आहेत. बदलत्या वातावरणामुळे आरोग्य विषयक समस्या बळावल्या आहेत. सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढल्याचे चित्र दिसत आहे.