नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या शाळेतील किती शिक्षक मुख्यालयी राहतात, याची माहिती मागाविणार्या आमदार प्रशांत बंब यांनी आता शिक्षक बदली पक्रियेतील संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांचाही डेटा मागाविला आहे. हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आमदार बंब यांनी सध्याच्या चालू बदली प्रक्रियेत संवर्ग-1 मधील शस्त्रक्रिया केलेल्या किती शिक्षकांनी शस्त्रक्रियेच्या काळात अर्जित रजा घेतल्या नाहीत, त्यांचे नाव, शाळा व गाव निहाय व इतर मुद्यांची सविस्तर माहिती मागितली आहे. यामध्ये संवर्ग-1 मधील शस्त्रक्रिया केलेले परंतु ऑनलाइन मेडिकल बिल शासनास सादर न केलेले शिक्षकांची नांवे, शाळा व युआयडी क्रमांक माहिती द्यावी.
दिव्यांग शिक्षकांची संपूर्ण यादी त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रातील दिव्यांगतेची नोंद टक्केवारीनुसार तसेच अवयवाच्या उल्लेखासह मिळावी. सध्याच्या चालू बदली प्रक्रिये संवर्ग-1 मधील किती दिव्यांग शिक्षकांनी यूआयडी क्रमांक काढले नाही, त्यांची नावे, शाळा व गाव माहिती देणे. यूआयडी क्रमांक नसणार्या किती दिव्यांग शिक्षकांना बदली प्रक्रियेत सूट दिली आहे. त्या शिक्षकांची नावे, शाळा व गाव माहिती मिळणे. संवर्ग-1 मधील घटस्फोटीत शिक्षकांची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली आहे का? याबाबतची माहिती देणे.
सन 2019 साली पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत बदली केलेल्या किती शिक्षकांनी सध्याच्या चालू भरती प्रक्रियेत पुन्हा एकत्रीकरणासाठी अर्ज भरला आहे, त्यांचे नावे, शाळा व गाव माहिती. पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत बांधकाम अभियंत्यांचे अंतराचे बोगस दाखले ग्राह्य न धरता गुगल मॅपचे अंतर ग्राह्य धरण्यासाठी जिल्हा परिषदेकडे केलेले अपील माहिती व सुनावणी याबाबतची माहिती देणे. या मुद्यांवर आधारीत माहिती तपशिलवार तत्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी विनंती आमदार बंब यांनी काही जिल्हा परिषदांकडे केली आहे.
संबंधित माहितीच्या आधारे संवर्ग एक व दोन मधील सगळा गोंधळ बाहेर येणार आहे. त्यामुळे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने बदलीत प्राधान्य मिळवले आहे, असे गुरुजी प्रशासनाच्याही रडारवर येणार आहेत. दरम्यान, आ. बंब यांनी काही दिवसांपासून मुख्यालय आणि आता बदल्या प्रकरणातून गुरुजींना जणू टार्गेट केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिक्षकांमधून असंतोष निर्माण झाल्याचे दिसते.